मुंबई- कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक बजेट पूर्णपणे काेलमडले आहे. प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाला काेराेनामुळे खीळ लागल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. ऑगस्ट महिन्याचे 12 दिवस झाले तरी अद्याप जुलै, 2021 महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांना आर्थिक संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी वेतनासाठी दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अजून किती आत्महत्यांची प्रतीक्षा सरकार आहे, असा प्रश्न एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी उपस्थितीत केला आहे. वेतनाबाबत एसटी महामंडळाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
मदतीसाठी शासनाला प्रस्ताव
मागील वर्षी कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला होता. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. त्यानंतर सवलत मूल्याच्या रक्कमेतून अकराशे काेटी, असे एकुण 2 हजार शंभर काेटी रुपये दिल्याने जून महिन्यापर्यंतचे पगार महामंडळाने दिला आहे. पण, आता हा निधीसुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात काेराेनाचे रुग्ण संख्या घटली असले तरी एसटीच्या सुमारे दहा हजार बस रस्त्यावर धावत आहेत. पण, प्रवाशांची संख्या काही वाढलेली नाही. त्यामुळे एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. सध्या दिवसाला फक्त नऊ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी साडे आठ काेटी रुपये डिझेलवर खर्च हाेतात. त्यामुळे महिन्याला वेतनासाठी लागणारे सुमारे 290 काेटी रुपयांचा निधी उभा करणे महामंडळाला अशक्य हाेत आहे. त्यामुळे आता पुन्हा आर्थिक मदतीसाठी एसटी महामंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे.