मुंबई : वांद्रे येथील निवासस्थानी परब यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी खासदार किरीट सोमैया यांनी माझ्यावरती खोटे आरोप केले होते. यासंदर्भात मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. मी साई रिसॉर्टची जमीन विकलेली होती. त्याचा माझा कुठलाही संबंध नाही. या संदर्भात माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांनी राज्यपालांकडे माझी तक्रार केली होती. राज्यपालांनी लोकायुक्तांना निर्देश दिले होते. तर लोकायुक्तांच्या सुनावणीचा सोमवारी निर्णय आला आणि लोकायुक्तांनी किरीट सोमैया यांची याचिका फेटाळून लावलेली आहे.
लोकायुक्तांनी आरोप फेटाळून लावले : परब म्हणाले की, लोकायुक्तांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, अनिल परब यांचा या रिसॉर्टशी काही संबंध नाही. हे रिसॉर्ट सदानंद कदम यांचे आहे. सदानंद कदम हे लोकसेवकाच्या व्याख्येत बसत नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लोकायुक्तांनी फेटाळून लावलेल्या आहेत. मी सुरुवातीपासून म्हणत होतो की, माझ्यावरचे सगळे आरोप हे राजकीय द्वेषापोटी केले आहेत. किरीट सोमैया आणि भाजप तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी नको ते आरोप करत आहेत. हे चौकशीचे आदेश देण्याचे काम ज्या यंत्रणांनी केले होते ही यंत्रणा देखील सगळी चुकीच्या मार्गाने आदेश देते आहे. हे या लोकायुक्तांच्या आदेशाने आज सिद्ध झाले आहे.
पुन्हा एकदा हायकोर्टत जाणार :मी किरीट सोमैया यांच्यावरती जो 100 कोटीच्या मानहानीचा दावा केला होता. त्याला आता सोमैया यांनी सामोरे जावे. त्यांना सांगितले होते, तुम्हाला नाक घासून माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी रुपये मला द्यावे लागतील. मी पुन्हा एकदा हायकोर्टात जाणार आहे. हे प्रकरण आता फक्त हायकोर्टात बाकी आहे. त्याच्यात देखील मला इंटरियम स्टे मिळालेला आहे. त्यामुळे किरीट सोमैया यांच्यावरचा दावा हा माझा अतिशय मजबूत होतो. मी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जाणार आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून किरीट सोमैया यांना योग्य ती शिक्षा द्यावी असे सांगणार, असेही परब यांनी स्पष्ट केले.
अनिल परब यांचा इशारा : अनिल परब म्हणाले की, सोमैया यांनी जे काय कृत्य केले आहे ते आता बाहेर आलेले आहे. त्याच्यामुळे नैतिक अधिकार त्यांनी गमावलेले आहेत. कोणावरही आरोप करायचा. जे आरोप केले आहेत, त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे. हे लोकायुक्तांनी आता सिद्ध केले आहे. या सगळ्या चौकशीत आम्हाला कुटुंबाला मानसिक त्रास झाला. हा मानसिक त्रास आता भरून कोण देणार. मी राजकारणात आहे मला होणारा त्रास माझा राजकीय भाग समजून मी सहन करीन. परंतु, माझ्या कुटुंबाने कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांना ज्या प्रकारे मानसिक त्रास झालेला आहे. हा त्रास किरीट सोमैया हे भरून कसा देणार आहेत? त्याच्या बाबतीत कुठलाही वाद नाही. कारण मी देखील ही लढाई अशी सोडणार नाही. असा थेट इशाराच अनिल परब यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- Kirit Somaiya on Sai Resort : साई रिसॉर्टवर आज हातोडा पडणारच; किरीट सोमय्या दापोलीत
- Relief To Anil Parab: साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरण; अनिल परबांना 21 जूनपर्यंत दिलासा
- Sai Resort Construction Case: दापोली येथील 'साई रिसॉर्ट' बांधकाम प्रकरण; आरोप पत्रातून माजी मंत्री अनिल परबांचे नाव वगळले