मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे प्रतिक आहेत. त्यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकारने रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार इंग्लंडमधून आणण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे आणि गडकिल्ले हे तरूणांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.
सहस्त्र जलकलश रथयात्रा - छत्रपती शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुंबई ते रायगड येथे सहस्त्र जलकलश घेऊन जाणाऱ्या रथयात्रेला आज मुंबईत सुरुवात झाली. राज्यपाल रमेश बैस यांनी या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तत्पूर्वी सुधीरदास महाराज यांनी जलकलश पूजन विधी सांगितल्याप्रमाणे राज्यापालांनी विधीवत दलकलशांचे पूजन केले. यावेळी शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे सुनील पवार बाळंभट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
शिवराय सर्किट राबवावे - राज्यपाल रमेश बैस यावेळी बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य हे प्रत्येकासाठी अत्यंत प्रेरणादायी असे आहे. महाराष्ट्र हे दृष्टे राज्य होते शिवाय ईस्ट इंडिया कंपनीकडून केला जाणारा उद्योग आणि औरंगजेबाकडून होणारे धोके हे महाराजांनी सर्वात आधी ओळखले होते. त्यांचे धोरण व्यापार उदीमाला चालना देणारे होते. शिवरायांनी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांची ओळख ही महाराष्ट्राला आहेच. परंतु त्यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात शिवाजी महाराज सर्किट तयार करण्याची योजना सरकारने हाती घ्यावी आणि राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील मोहीम राबवावी असे राज्यपाल यावेळी म्हणाले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पवित्र जल -देशभरातील अनेक नद्यांमधील पाणी हे शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यासाठी वापरण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्रामधून मिळणारी प्रेरणा आणि आदर्श हा पुढील पिढीने अंगीकरावा यासाठी सरकार प्रयत्न करणार असून त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील असेही यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले.
हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj : 'शिवरायांची जगदंबा तलवार, वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात आणणार'