मुंबई-कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरच कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत इंटर्न, निवासी डॉक्टर, एसएमओ आणि इतर डॉक्टर कोरोनाबाधित होत होते. मात्र, सायन रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. सायन रुग्णालयाच्या डेप्युटी डीन यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर डीनदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यांची उद्या-परवा कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे. तर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या डेप्युटी डीनला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नायर, कस्तुरबा, सायन, कूपर आदी रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे. डॉक्टर-नर्स थेट रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने आवश्यक ती काळजी घेतल्यानंतरही काही डॉक्टर कोरोनाबाधित होत आहेत. यात इंटर्न आणि निवासी डॉक्टरांचा भरणा मोठा आहे. तर त्यातही डॉक्टरांसाठी सायन रुग्णालय हॉटस्पॉट ठरला आहे. याच रुग्णालयात सर्वाधिक निवासी डॉक्टर आणि इतर डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.