मुंबई- महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात कोरोनाबाधित गरोदर महिलांसाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या विशेष कक्षात प्रसूतिशास्त्र विभाग, नवजात शिशू व बालरोग चिकित्सा विभाग आणि भूलशास्त्र विभाग या तीन विभागांच्या सुयोग्य समन्वयातून 306 गरोदर महिलांची सुखरूप प्रसूती झाली आहे. रुग्णालयात आतापर्यंत 63 टक्के 'नॉर्मल डिलिव्हरी', तर 37 टक्के 'सिझेरियन'द्वारे प्रसूती झाली आहे.
एकाच रुग्णालयात 306 कोरोनाबाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. नायर रुग्णालयातच 10 बाळांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिका आणि रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालय एप्रिल महिन्यात 'कोविड रुग्णालय' म्हणून घोषित झाले. रुग्णालयात 14 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली.
सिजेरियन डिलीवरी प्रकारातील प्रसूती सुखरूपपणे होण्यात नायर रुग्णालयातील भूलशास्त्र विभागाची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. प्रसूती झालेल्या 306 मातांपैकी 254 मातांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.