मुंबई - कोरोनाच्या परिस्थितीत शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यातच दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज (10 जून) माजी राज्य कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दुधासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी दुधासाठी मंत्रालयासमोर आंदोलन केले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्तेही होते.
'ऊसाच्या धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी'
'राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार ३/५ फॅट व ८/५ एसएनएफनुसार किमान २५ रुपये प्रतिलिटर दर देणे आवश्यक आहे. मात्र, या आदेशाला सहकारी व खासगी दूध संस्थाकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. तर, दुसरीकडे दुधाला कमी भाव देणाऱ्या संस्था व खासगी कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्याचे काम दुग्ध विकास विभागाकडून होत नाही. इतकेच नाही तर खासगी दूध संस्था व खासगी कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याप्रमाणे ऊस उत्पादक आणि साखर कारखाने यांच्यामध्ये ऊसासाठी किमान आधारभूत किंमत (FRP) आहे. त्याच धर्तीवर दुधालाही FRP किंवा MSP मिळावी. महाराष्ट्रातील दुध उत्पादकांना समान भाव देणे गरजेचे आहे', असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
'आत्महत्या रोखण्यासाठी दुधाला भाव द्या'