महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेचा लोकल प्रवास? फोन उचलायला ठेवला होता एक माणूस

मनसुख हिरने यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने मुंबईतील लोकलने प्रवास केल्याचे समोर आले आहे. शिवाय, आता मनसुख यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्टरही एनआयएच्या रडारवर आले आहेत.

sachin  waze
सचिन वाझे

By

Published : Apr 3, 2021, 12:19 PM IST

Updated : Apr 3, 2021, 2:48 PM IST

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) हाताळत आहे. या प्रकरणी सचिन वाझे अटकेत आहे. वाझेने अत्यंत शांत डोक्याने हे संपूर्ण कृत्य केल्याचे दिसून येत आहे. त्यातच, आता सचिन वाझेने मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या दिवशी मुंबई ते ठाणे असा लोकलने प्रवास केला होता, असे समोर आले आहे.

फोन उचलण्यासाठी ठेवला होता मित्र

लोकलच्या गर्दीत ओळख पटणे कठीण आहे. त्यामुळे वाझे ठाण्याला लोकलने गेल्याचे तपासात समोर आले आहे. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून वाझेने मोबाईल कार्यालयात ठेवला होता. एका मित्राला तो उचलण्यासाठीही ठेवले होते. जर कोणाचा फोन आल्यास साहेब कामात असल्याचा मेसेज देण्यास त्याला सांगितले होते.

सीएसएमटी जवळील सिग्नलवरील CCTV मध्ये सचिन वाझे कैद
सचिन वाझे मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर ७ च्या सुमारास जीपीओ जवळील सिग्नलवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर तो ठाणे स्थानकाबाहेर दिसला. पुन्हा लोकलनेच प्रवास करून तो भायखळ्याला उतरून बारवर रेड करण्यासाठी गेला. यावेळी त्याने त्याच्या सहकाऱ्यांना त्याचा ऑफिसमध्ये ठेवलेला मोबाईल आणण्यास सांगितले. जेणेकरून सर्व लोकेशन एकत्र दिसतील आणि वाझेंवर कुणाला संशयही येणार नाही.

मनसुख यांचे शवविच्छेदन करणारे डॉक्टरही एनआयएच्या रडारवर

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कोणा कोणाचा सहभाग आहे? त्या दिवशी कोण घटनास्थळी होते ? वाझेचा रोल त्यात काय होता ? याचा तपास एनआयए करत आहे. हिरेन यांची हत्या गायमुख जवळील परिसरात केल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू बुडून झाल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे शवविच्छेदन करणारे डॉक्टरही आता रडारवर आहेत. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या स्कॉर्पिओ प्रकरणातील मनसुख हिरेन हे एक दुवा होते. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलं नाही ? शवविच्छेदनावेळी डॉक्टरांनी वाझेची भेट का घेतली? नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली ? याची माहिती NIA घेत आहे.

हेही वाचा -अँटिलिया प्रकरण : आठवी गाडी 'एनआयए'च्या ताब्यात; जाणून घ्या आलिशान गाड्यांबद्दल

हेही वाचा -सचिन वाझे प्रकरण : 'ती' महिला हॉटेल ट्रायडेंट मधलीच, सूत्रांची माहिती

Last Updated : Apr 3, 2021, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details