मुंबई -सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अँटिलिया कार स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण याचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत आणि सीसीटीव्ही फुटेज तसेच अनेक दस्तावेज तपासण्यात आले आहेत. या प्रकरणात सचिन वाझे यांनी हॉटेल ट्रायडेंटमध्ये एक रुम बुक केल्याचे देखील समोर आले होते. तसेच या ट्रायडेंट हॉटेल मधला एक सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागला होता. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाझेच्या हातात काही बॅग दिसत होत्या. तसेच त्यांच्यासोबत एक महिला देखील दिसत होती. याच महिलेचा शोध मागच्या अनेक दिवसांपासून एनआयए घेत होती. अखेर ती महिला समोर आली आहे.
सचिन वाझे प्रकरण : 'ती' महिला हॉटेल ट्रायडेंट मधलीच, सूत्रांची माहिती - NIA questions woman suspected in Vaze case
शुक्रवारी एनआयए कार्यालयामध्ये जी महिला आली होती. जिच्यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तीच महिला आहे, जी वाझे सोबत हॉटेल ट्रायडेंटमध्ये होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कमालीची गुप्तता पाळत एनआयए कार्यालयात काळ्या रंगाच्या काचा असलेली एक गाडी आत शिरली आणि कार्यालयाच्या मागच्या बाजूने असलेल्या गेटमधून ती महिला एनआयए कार्यालयात गेली. माध्यमांना या महिलेचे फोटोज अथवा व्हिडिओ मिळू नये म्हणून एक गाडी गेटच्या समोर आडवी लावण्यात आली होती.
काही तासांच्या चौकशीनंतर पुन्हा दोन महिला या मागच्या गेटने बाहेर येऊन गाडीत बसल्या. एक महिला पुढच्या सीटवर बसली तर दुसरी महिला गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसली. प्रसार माध्यमांना फोटोज अथवा व्हिडिओ मिळू नये म्हणून प्रसारमाध्यमांची नजर चुकवत महिला मागच्या बाजूला असणाऱ्या सीट खाली लपली. मात्र माध्यमांनी या महिलेची हालचाल आपल्या कॅमेर्यात टिपली.