मुंबई Sachin Tendulkar Statue : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं मुंबईच्या वानखेडे स्टेडियमशी खास नातं आहे. हे मैदान या दिग्गज खेळाडूचं होम ग्राउंड होतं. त्यामुळे इथे खेळणं त्याच्यासाठी नेहमीच स्पेशल असायचं. या स्टेडियममधील एका स्टँडला आधीच सचिनचं नाव देण्यात आलंय. आता येथे त्याचा एक भव्य पुतळाही उभारण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला सचिनची उपस्थिती : मुंबई क्रिकेट असोसिएशननं वानखेडे स्टेडियमवरील 'सचिन तेंडुलकर स्टँड'च्या बाजूला सचिनचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकातील भारत श्रीलंका सामन्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी त्याचं उद्घाटन होईल. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी शुक्रवारी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना ही माहिती दिली. या उद्घाटन सोहळ्याला स्वत: सचिन तेंडुलकर उपस्थित राहणार असल्याचंही काळे यांनी सांगितलं. तसेच यावेळी विद्यमान भारतीय क्रिकेट संघाचे सदस्यही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सचिनचं घरचं मैदान : एमसीएनं या वर्षाच्या सुरुवातीलाच सचिनचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता. सचिननं यंदा वयाची ५० वर्ष पूर्ण केली आहेत. सचिन तेंडुलकर मूळचा मुंबईचा. तो वांद्रे उपनगरातील साहित्य सहवास येथे लहानाचा मोठा झाला. त्यानं मध्य मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथून दिवगंत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणं सचिनसाठी नेहमीच स्पेशल असायचं.
..म्हणून वानखेडे स्टेडियम स्पेशल :वानखेडे स्टेडियम सचिनसाठी आणखी एका कारणामुळे स्पेशल आहे. हे स्टेडियम त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या क्षणाचा साक्षीदार आहे. येथे २ एप्रिल २०११ रोजी भारतानं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यासह सचिननं नोव्हेंबर २०१३ मध्ये याच स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीनंतर त्यानं वानखेडेवर आपल्या २४ वर्षांच्या शानदार कारकीर्दीला पूर्णविराम दिला. वानखेडे स्टेडियमवरील ऐतिहासिक १९९१ रणजी ट्रॉफी फायनलही सचिनसाठी संस्मरणीय आहे. या सामन्यात मुंबईचा हरियाणाविरुद्ध अवघ्या दोन धावांनी पराभव झाला होता. सचिननं पहिल्या डावात ४७ आणि दुसऱ्या डावात ९६ धावा केल्या, मात्र त्याचे हे प्रयत्न व्यर्थ गेले. अशा या महान फलंदाजाचा आता त्याच्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा सन्मान होतो आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : सचिन तेंडुलकरचा 'हा' विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला विराट कोहली
- Virat Kohli Cutout in Kolhapur : कोल्हापुरात विश्वचषकाचा फिव्हर; चाहत्यांनी उभारला विराट कोहलीचा पंधरा फुट कटआउट, पहा व्हिडिओ