महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा नेत्यांना मानसिक उपचाराची गरज, सचिन सावंत यांची टीका

अटलबिहारी वाजपेयी यांचा अपमान करण्यापर्यंत भाजपा नेत्यांची मजल गेली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्रातील मदरसे बंद करा म्हणणाऱ्या अतुल भातखळकरांनी मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन मोदींचे ‘सब का विश्वास’ म्हणणे हे ढोंग आहे का?, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.

sachin sawant critisize atul bhatkhalkar on the statement of madarsa
सत्ता गेल्यापासून संतुलन ढासळलेल्या महाराष्ट्र भाजपा नेत्यांना मानसिक उपचाराची गरज- सचिन सावंत

By

Published : Oct 17, 2020, 7:22 PM IST

मुंबई - सत्ता गेल्यापासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना मानसिक उपचाराची गरज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राचा अपमान करणारे भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या नादात आपल्या वरिष्ठ नेत्यांनाही जुमानेसे झाले आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्रातील मदरसे बंद करा म्हणणाऱ्या अतुल भातखळकरांनी मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेऊन मोदींचे ‘सब का विश्वास’ म्हणणे हे ढोंग आहे का, असा प्रश्न कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारचा ‘सब का विश्वास’ ही भूमिका ढोंग आहे, हे मान्य करावे, अथवा भातखळकरांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गोळवलकर असतात. भाजपाची भूमिका दांभिकपणाची व दुटप्पी असते, यात कोणतीही शंका नाही. देशातील संविधानावर यांचा विश्वास नाही; परंतु आपल्या पक्षाच्या घटनेवरती देखील यांचा विश्वास नाही. पक्षाच्या घटनेतील सेक्युलॅरिझम हा शब्द त्यांनी काढून टाकला पाहिजे, असे सावंत म्हणाले.

अतुल भातखळकरांनी महाराष्ट्रातील मदरसे बंद करावे, अशी मागणी करताना आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका काय आहे, हे तपासले असते तर बरे झाले असते. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी २० ऑगस्ट २००१ रोजीपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची मरदशांच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याची कोणतीही इच्छा नाही, हे स्पष्ट केले होते. तसेच मदरशांचे आधुनिकीकरण करुन तेथील धार्मिक शिक्षणाच्या कामात हस्तक्षेप न करता विज्ञान, गणित, समाजशास्त्र व सामान्यज्ञान हे विषय तेथे शिकवले जावे, हे स्पष्ट केले होते. फेब्रुवारी २००२मध्ये जोशी यांनी जवळपास एक हजार मदरशांना केंद्र सरकार अनुदान देत आहे, असेही सांगितले होते. भाजपा नेते वाजपेयी यांचाही अवमान करत आहेत. तसेच नरेंद्र मोदींच्या भूमिकेचीही तमा ते बाळगत नाहीत, हे आश्चर्य आहे.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २०१२च्या निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरणाचे आश्वासन देण्यात आले होते. त्याचबरोबर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जाहिरनाम्यातसुद्धा मदरशांच्या आधुनिकीकरणाचा दोनदा उल्लेख केलेला आहे. ११ जून २०१९ रोजी केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मदरशांच्या आधुनिकरणासाठी पावले उचलून तेथील शिक्षकांना अन्य संस्थांकडून हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व संगणक विषयाचे प्रशिक्षण देऊन मदरशांतील विद्यार्थ्यांना या शिक्षणाचा लाभ मिळेल, याकरिता योजना जाहीर केली होती. नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम युवकांकरीता एका हातात कुराण व दुसऱ्या हातात संगणक हे व्हिजन असल्याचे सांगितले होते; तसेच ‘सब का विश्वास’ ही घोषणा दिली होती. मोदींजीच्या कृती व कथनी यातील फरकातून ही घोषणा पूर्णपणे पोकळ आहे, हे आधीच स्पष्ट झाले आहे. तरी देखील आता भातखळकरांच्या वक्तव्यातून मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे, अधोरेखित होते.

भातखळकरांच्या भूमिकेशी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सहमत आहेत का? असल्यास मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे, हे मान्य करावे, अन्यथा भातखळकरांवर कारवाई करावी, असे सावंत म्हणाले. सत्ता गेल्यापासून भाजपा नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. आपल्या भूमिकेतून आपण महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेचा अपमान करत आहोत. मुंबई पोलिसांना बदनाम करत आहोत किंवा मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या व्यक्तीचे समर्थन करताना, तिला झाशीची राणी संबोधित करताना, झाशीच्या राणीचा अपमान होत आहे, याचीही चिंता त्यांना राहिली नाही. आता तर स्वतःच्या नेत्यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details