मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांकडून देशात ध्रुवीकरणाचे राजकारण होत आहे. ‘हिंदू खतरें में,’ असे भाजपचे लोक सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात मोदींच्याच राज्यात ‘हिंदू खतरें में’, अशी स्थिती झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
देशातील बँकांमध्ये असणारा पैसा सुरक्षित राहिलेला नाही. अनेक कुटुंबेही उद्धस्त झाली आहेत, याला मोदी सरकारच जबाबदार आहे. येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने या बँकेत ठेवलेले पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. या अगोदर पंजाब महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यामुळेही अनेकांच्या आयुष्यभराची कमाई बुडाली. नोटबंदीमध्ये करोडो लोक रस्त्यावर आले. त्यातही बहुसंख्य हिंदूच होते. देशात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही बहुसंख्य हिंदूच आहेत. हिंदूंवर ही परिस्थिती मोदींचे राज्य असतानाच आली आहे.
हेही वाचा -येस बँक प्रकरण: चौकशीसाठी राणा कपूरला आणले 'ईडी' कार्यालयात...
घोटाळेबाजांनी हिंदूंच्या देवतांनाही सोडले नाही. पुरीच्या जगन्नाथ मंदिराचेही येस बँकेमध्ये असलेले ५४५ कोटी रुपये बुडीतच जमा झाले आहेत. या येस बँकेत १८ हजार २३८ कर्मचारी असून यातही हिंदू आहेतच. त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असून त्यांच्याच निष्क्रिय कारभाराचा फटका या हिंदूंना बसला आहे, असे सचिन सावंत म्हणाले.
येस बँकेवर निर्बंध घातल्याने महाराष्ट्रातील १०९ बँका अडचणीत आल्या आहेत. यात विदर्भातील मध्यवर्ती बँकांसह काही सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या ठेवीही आहेत. मात्र, बडोदा महानगरपालिकेच्या बडोदा स्मार्ट डेव्हलमेंट कंपनीचे २६५ कोटी रुपये येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच काढून घेण्यात आले आहेत. यातून मोदी-शाह यांना देशाची नव्हे तर फक्त गुजरातचीच काळजी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आहे. या महानगरपालिकेचे ९०५ कोटी रुपये येस बँकेत आहेत. मोदी-शाहांनी बडोदा महापालिकेसारखेच किमान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कानात जरी सांगितले असते, तरी ते या संकटातून वाचले असते. मात्र, गुजरातप्रेमापुढे त्यांना इतर कोणीच दिसत नाही असेच म्हणावे लागते, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.