महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर मोदी यांनी भारतीय जनतेची माफी मागावी - सचिन सावंत - Nawab Malik

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

सचिन सावंतआणि नवाब मलिक

By

Published : Apr 19, 2019, 9:49 PM IST

Updated : Apr 20, 2019, 12:01 AM IST

मुंबई - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भारतातील शहिदांचा अपमान झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. काँग्रेस प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सचिन सावंत आणि नवाब मलिक

साध्वी यांच्या वक्तव्याने भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा आणि बेगडी देशप्रेमाचा मुखवटा गळून पडला आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. तर दुसरीकडे भाजपला जराही लाज असेल तर पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी सावंत यांनी केली. साध्वी यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा अपमान केला आहे. याबाबत जवानांच्या नावाने मत मागणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली.

तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी पोलीस कोठडीत आपला अतोनात छळ केला. ते देशद्रोही होते. कोणत्याही पुराव्याशिवाय त्यांनी आम्हाला मालेगाव बॉम्ब स्फोटाप्रकरणी अटक केली होती. अखेर माझ्या शापाने देशद्रोही हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला, असे खळबळजनक वक्तव्य साध्वी यांनी भोपाळ येथे केले. यावर देशभरात खळबळ उडाली असून साध्वी यांच्या वक्तव्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला आहे.

साध्वी यांनी महाराष्ट्राचे महान वीरपुत्र शहीद करकरे यांचा अवमान केला आहे. हा फक्त करकरेंचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि शहिदांचा अवमान आहे. शहिदांच्या शौर्याच्या राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपने तात्काळ माफी मागावी आणि साध्वींची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी सावंतांनी केली. करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वींचा मुख्यमंत्र्यांनी अद्याप साधा निषेधही केला नाही. महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल मोदी आणि शाह यांना आनंद होत असेल पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपला हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहताना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी विचारला.

साध्वी भोपाळमधून भाजपच्या उमेदवार आहेत. भाजपने साध्वी यांना उमेदवारी देवून आतंकवादाला समर्थन दिले आहे. हे स्पष्ट होत असून साध्वीच्या रुपाने भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजप आतंकवादाशी लढत असल्याचे ढोंग करत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. जसे मोदी स्क्रिनवर स्क्रिप्ट वाचून बोलतात. त्याप्रमाणे साध्वी यांना भाजपकडून स्क्रिप्ट लिहून देण्यात आली होती, असा आरोप मलिक यांनी केला. भाजपने जिवंतपणी करकरेंवर खोटे आरोप केले आणि शहीद झाल्यावरही त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवून त्यांचा अपमान केला, असा आरोपही मलिक यांनी भाजपवर केला.

Last Updated : Apr 20, 2019, 12:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details