मुंबई - सामनाच्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला चांगलेच धुतले आहे. तांडव'मधील कोणत्या दृश्यांवर भाजपचा आक्षेप आहे व तो का आहे यावर चर्चा व्हायला हरकत नाही, पण अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा आत्मा शांत होईल. पुलवामा हल्ल्यासंदर्भातील अर्णबचा संवाद हा पाकडय़ांच्या सोयीचाच आहे व इम्रान खान यांनी त्याबाबत प्रतिक्रिया द्यावी हे भलतेच साटेलोटे आहे. भाजपातील काही शेंबडय़ांनी आता अशी मुक्ताफळे उधळली आहेत की, अर्णबचे गुप्त 'चॅट' उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबडय़ांनो, मुळात तुमच्या त्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली त्यावर आधी बोला असा सणसणीत टोला सामनातून भाजपाला लगावण्यात आला आहे.
काय म्हटले आहे आग्रलेखात
अर्नबचे चॅट समोर आणून मुंबई पोलिसांनी देशावर उपकारच केले आहेत. हे अस्तनीतले साप देशाच्या मुळावरच आले होते. त्यांचा फणा मुंबई पोलिसांनी ठेचला तर भाजपच्या शेंबडय़ांना संताप का यावा? आम्हाला आश्चर्य वाटते की, देशातील तमाम तथाकथित राष्ट्रभक्त म्हणवून घेणाऱया मीडियाचे. हे लोक स्वतःला राष्ट्राचा चौथा स्तंभ की काय समजतात ना! मग त्यांच्यातल्याच एका वाळवी किडय़ाने देशाचा स्तंभ पोखरला, राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली गुपिते फोडली, त्याने देशद्रोहच केला तरी 'मीडिया' थंड का? एरवी सुशांत, कंगना, ईडी, धनंजय मुंडे प्रकरणांवर चोवीस तास वखवखणाऱयांना अर्णबच्या देशद्रोही कृत्याची घृणा सोडा हो, पण संताप येऊ नये याचेच दुःख वाटते. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून 'तांडव' करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर 'राष्ट्रीय बहस' करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? 'तांडव' सुरू आहे, ते चालतच राहील!
भाजपा सध्या हास्यविनोदाचा विषय
भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत. 'तांडव' नावाची एक वेब सीरिज सध्या प्रदर्शित झाली आहे. सध्याच्या राजकारणाचे वास्तव दाखवणारी ही सीरिज असल्याचे सांगतात. दिल्लीचे राजकारण, विद्यापीठातील राजकीय चढाओढ असे काही विषय त्यात घेतले आहेत, पण या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी काही आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. भगवान शंकर आणि नारदाच्या संवादातून श्रीरामाचा उल्लेख उपहासात्मक पद्धतीने झाल्याचे 'तांडव' भाजपने सुरू केले. हिंदू देवदेवतांबाबत कोणत्याही प्रकारची अपमानास्पद विधाने शिवसेनेने कधी खपवून घेतली नाहीत. एम.एफ. हुसेन हे नक्कीच महान चित्रकार होते, पण त्यांनी हिंदू देवतांची चित्रे ज्या पद्धतीने रेखाटली त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला. वाद इतका पेटला की, एम.एफ. हुसेन यांना देश सोडून जावे लागले.