Saamana Article News: गायब मुलींची धक्कादायक माहिती समोर, ठाकरे गटाची शाह-मोदींवर सडकून टीका - गायब मुलींची धक्कादायक माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री शाह ही जोडगोळी विश्वाचे तारणहार आहोत, या अविर्भावात आहेत. 2014 नंतर भारत देश अस्तित्वात आल्याचा कांगावा केला जातो आहे. याच भारतातून मुली गायब होण्याची संख्या लक्षणीय आहे. गुजरातमधून मागील पाच वर्षात 40 हजार महिला आणि मुली गायब झाल्याचा धक्कादायक अहवाल एनसीबीने समोर आणला आहे. दैनिक सामनातून यावरून पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाहंवर चौफेर टीकास्त्र सोडले आहे. तसेच सरकारचे धिंडवडे काढणारा अहवाल जाहीर केल्याने एनसीबीला आता कायमचे टाळे लागू शकते, अशी शक्यता ही सामना वृत्तपत्रातून वर्तवण्यात आली आहे.
संजय राऊत
By
Published : May 9, 2023, 10:41 AM IST
मुंबई :मागील काही वर्षापासून देशात मुली गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात मुली गायब होण्याचे प्रमाण वाढल्याची आकडेवारी दोनच दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. आता, गुजरातमधील बेपत्ता मुलींचा अहवाल चव्हाट्यावर आला आहे. दैनिक सामनातून यावरून मोदी-शाहंवर सडकून टीका केली आहे. गुजरातचा विकास झपाट्याने होतो आहे. रोजगार वाढले आहेत. मोदी-शाहंच्या राजवटीने हे सर्व घडवून आणले आहे. आता ज्या हजारो मुली गुजरातमधून बेपत्ता झाल्या किंवा होत आहेत, त्या बेपत्ता मुलींचा शोध कोण घेणार? कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल. नाही तर या मुलींचे पलायन किंवा अपहरणास नेहरू-गांधी परिवारच कसा जबाबदार आहे, यावर ‘मन की बाता-बाती’ करून लोकांना गुमराह करण्याचा नेहमीचा प्रयत्न होईल, अशी कोपरखळी मारली आहे.
गुजरात सरकारचे धिंडवडे :पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री शाह ही जोडगोळी आपणच विश्वाचे तारणहार आहोत, अशा आविर्भावात वावरते. 2014 च्यापूर्वी भारत देश कधी अस्तित्वात नव्हता. येथे कायदा संस्कृती नव्हती. 2014 ला मोदी पंतप्रधान झाले आणि देशात सगळी आबादी आबाद झाल्याचा दावा ते आणि त्यांची भक्तमंडळी करत असते. मात्र आता मोदी-शाहंच्या कारभाराचे ढोंग उघडे पाडणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुजरातमधून गेल्या पाच वर्षांत 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची माहिती एनसीबीने जाहीर दिली आहे. दैनिक सामानातून यानंतर मोदी -शाहंची कोंडी केली आहे. पंतप्रधान मोदी यांना पाण्यात पाहणाऱ्या राजकीय विरोधकांनी नव्हे तर नॅशनल क्राइम ब्युरोने हा धक्कादायक अहवाल जाहीर केला आहे.
विरोधात बोलल्यावर कारवाईचा बडगा :गुजरातमधील राज्यकारभाराचे धिंडवडे या अहवालाने निघाले आहेत. देशात सत्ताधाऱ्यांवर विरोधात बोलल्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येते. आता माहिती समोर आणल्याबद्दल नॅशनल क्राईम ब्युरोला कायमचे टाळे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच जगाच्या पाठीवर गुजरातसारखे दुसरे राज्य नाही. गुजरात हेच देशाच्या विकासाचे एकमेव मॉडेल आहे, असा प्रचार केला जातो. गुजरात हे पंतप्रधान मोदींचे राज्य असल्याने तेथे स्वर्ग असल्याचे चित्र रंगवण्यात येत असल्याचे शालजोड मारण्यात आले आहेत.
हजारो महिला आणि मुली बेपत्ता :भाजपसाठी ‘लव्ह जिहाद’ हा तणाव निर्माण करण्याचा हुकुमी एक्का आहे, परंतु, गुजरातसह अनेक राज्यांतून हजारो महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत. भाजपचा एकही जेहादी यावर बोलायला तयार नाही. राजधानी दिल्लीत महिला अत्याचार व निर्घृण हत्येचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याचे आकडेवारी सांगते. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. भारतात गरीब महिलांना फूस लावून, नोकरीच्या आमिषाने पूर्वी आखाती राष्ट्रांत पाठवले जात असायचे. तेथे गेल्यानंतर फसलेल्या महिला मरेपर्यंत अरबांच्या गुलाम म्हणून जगत आल्या आहेत. सध्या प्रमाण कमी झाले असले, तरी मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याबाबत चिंता वाटते, अशी भीती सामनामधून व्यक्त केली आहे.
शोध कोण घेणार?तसेच गुजरातमधील मुली बेपत्ता होण्याचे आलेले आकडे अस्वस्थ करणारे आहेत. गुजरातचा विकास झपाट्याने होतो आहे. दुसरीकडे विकास दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोजगार वाढत आहे. क्रिकेटच्या सामन्यात गुजरात संघ जिंकू लागले आहेत. हे इतके सर्व मोदी-शाहंच्या राजवटीने घडवून आणले, मग ज्या हजारो मुली गुजरातमधून बेपत्ता झाल्या, होत आहेत, त्या मुलींचे नातेवाईक आक्रोश करीत आहेत, त्या बेपत्ता मुलींचा शोध कोण घेणार? कायद्याचे राज्य गुजरातमध्ये अस्तित्वात असेल तर त्या मुलींना न्याय मिळेल, असा घणाघात आज सामनातून मोदी-शाहवर करण्यात आला आहे.
महिला सबलीकरणासाठी योजना :देशात महिला अत्याचारांच्या करुण स्तरावर कहाण्या प्रसिद्ध होत आहेत. दिल्लीच्या जंतर - मंतरवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला कुस्तीपट्टू न्यायासाठी बसले आहेत. पंतप्रधान मोदी ना त्यावर बोलत आहेत, ना केंद्रीय मंत्री अमित शाह बोलायला तयार आहेत. अशातच गुजरातमधून 40 हजार महिला बेपत्ता होणे, हे गंभीर आहे. तसेच गुजरातचा इतका मोठा आकडा असेल तर देशाचा आकडा भयावह असणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ज्या पद्धतीने महिलांसाठी जनधन योजनेसारखी योजना सुरू केली. या धर्तीवर महिला सबलीकरणासाठी योजना जाहीर करावी.
बेपत्ता मुलींचा शोध घ्यावा :पोलिसांना बेपत्ता मुली शोधायला जमत नसेल, तर त्यांनी गुवाहाटीसारख्या विधी घडवून लाखो बेपत्ता मुलींचा शोध घ्यावा. अन्यथा, गुजरातच्या साबरमती आश्रमात राणा दांपत्याला 21 दिवस अखंड हनुमान चालीसा पठण करण्यास बसवावे, असा चिमटा सामनातून काढला आहे. सरकारने काही करावे, पण बेपत्ता मुलींचा शोध लावावा. तसेच मुली बेपत्ता होण्याचे लक्षण बरे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना मुली कुठे गेल्या त्याबाबत चिंतन करणार नसतील, त्यांना कशाहीची चिंता नाही, असा त्याचा अर्थ निघतो, असेही सामनामधून म्हटले आहे.