मुंबई- राज्यात सत्तास्थापनेसाठी सुरू असलेला गोंधळ अद्याप शेवटच्या अंकाकडे सरकल्याचे दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेतील धुसपूस सुरूच असून मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून आज सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. सत्तेचा अमरपट्टा आपण जन्मतःच घेऊन आलो आहोत व बहुमताचा आकडा असो अगर नसो दुसर्या कोणी सत्ता स्थापनच करू नये, या मग्रुरीचा महाराष्ट्रात पराभव झाला आहे. तेच लोक राष्ट्रपती राजवट लावण्याचे इशारे देत आहेत. राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देणार्यांनी आधी सरकार स्थापनेचा दावा तरी करावा! मग पुढचे पुढे. राष्ट्रपती ही घटनेतील सर्वोच्च संस्था आहे. तेथे व्यक्ती नाही तर देश आहे. देश कुणाच्या खिशात नाही, अशी टीका अग्रलेखातून केली आहे.
हेही वाचा -काँग्रेसचे बाळासाहेब थोरात बनू शकतात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
'7 नोव्हेंबरपर्यंत सत्तेचा तिढा न सुटल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल.' मुनगंटीवार व त्यांच्या पक्षाच्या मनात नेमके कोणते विष उसळते आहे, ते या वक्तव्यावरून दिसते. कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास कमी पडला की, हे व्हायचेच किंवा कायदा अथवा घटनेची गळचेपी करून हवे ते साध्य करायचे ही भूमिकासुद्धा त्यामागे असू शकते. एक तर राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का?, असा सवाल अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
राष्ट्रपती राजवटीची सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली धमकी लोकशाहीविरोधी तसेच घटनाबाह्य आहे. हा महाराष्ट्राचा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे. ‘संविधान’ नामक घरात राहणार्या रामदास आठवले यांनी डॉ. आंबेडकरांच्या घटनेचा असा अपमान सहन करू नये, असे म्हणत आठवलेंनाही टोला लगावला आहे.
हेही वाचा -चर्चेसाठी आमची दारे खुलीच, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत नाही : मुनगंटीवार
महाराष्ट्रात सरकार का बनत नाही याची कारणे कोणी द्यायची? भाजपचाच मुख्यमंत्री पुनः पुन्हा होईल असे ज्यांनी जाहीर केले, त्यांनी सरकार स्थापनेचा दावा पेश केला नसेल तर त्यास काय महाराष्ट्राच्या जनतेस जबाबदार धरायचे? आणि सरकार बनत नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी द्यायची ही तर मोगलाई आहे. महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या देऊ नका. कायदा, घटना व संसदीय लोकशाहीच्या प्रथा, परंपरा आम्हाला माहीत आहेत. कायदा व घटना कुणाचे गुलाम नाहीत. महाराष्ट्रात सध्या जो गोंधळ सुरू आहे त्याची ठिणगी आम्ही टाकलेली नाही हे जनता जाणते. सार्वजनिक जीवनात नीतिमत्तेने सर्वात खालची पायरी गाठली आहे. नैतिक कर्तव्याच्या बाबतीत राजकारणी व्यक्ती, पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात कमीजास्त कोण हे ठरविता येऊ नये, अशी आजची व्यवस्था आहे. राष्ट्राच्या चारही स्तंभांचा कणा साफ मोडून पडताना दिसत आहे व पोलीस यंत्रणा आपल्या धन्यांसाठी ‘आमदारां’ची जुळवाजुळव करण्यातच कर्तव्य मानीत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.