मुंबई - राज्यासह देशभरात सध्या पक्षांतराची लाट आहे. भाजप आणि शिवसेनेत अनेकजन प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र, या पक्षांतरामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घामाघूम होण्याचे कारण नाही. कारण, अच्छे दिनची कोवळी किरणे आता भाजप आणि शिवसेनेते मिळत असल्याचे शिवसेनेने मुखपत्र सामनातून म्हटले आहे.
राज्यात पक्षांतराचे रेशनिंग
पूर्वी दसरा, दिवाळीस रवा, साखर, तेलासाठी रेशनिंगच्या दुकानात रांगा लागायच्या तशा रांगा आता भाजप, शिवसेनेच्या बाहेर लागल्या आहेत. महाराष्ट्रात पक्षांतराचे रेशनिंग सुरू झाल्याचे सेनेने म्हटले आहे. राजकारणात फोडा, झोडा व राज्य करा या ब्रिटिश नीतीचा अवलंब जिल्हा परिषदांपासून ते राज्याच्या विधानसभा, लोकसभेपर्यंत अवलंबणारे काँग्रेसवालेच होते असेही सेनेने म्हटले आहे.
पवारांचे आरोप शिवसेनेला लागू नाहीत
इन्कम टॅक्स, ‘ईडी’सारख्या एजन्सीचा वापर करून आमदार फोडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केला आहे. मात्र, पवारांचा हा आरोप शिवसेनेला लागू होत नाही. कारण, शिवसेनेकडे आयकर, ईडी, पोलीस या संदर्भातली कोणतीही खाती नाहीत, असे सांगत भाजपला त्यांचे आरोप लागू होत असल्याचे एक प्रकारचे समर्थनच केले आहे.
तर अजित पवारांनी पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता
गंभीर गुन्हे व चौकशांची तलवार डोक्यावर असलेले लोक काँग्रेस पक्षात होते व तेच भीतीपोटी पक्षांतर करीत आहेत. मात्र, असा दबाव खरोखरच असता तर अजित पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता.
जिकडे सत्तेच्या गुळाची ढेप तिकडेच मुगळे
ज्या पक्षाकडे सत्ता आहे तिकडेच लोकांचे पक्षांतर होत आहे. जिकडे सत्ता तिकडे पक्षांतर हा राजकीय नियमच बनला असल्याचे सेनेने म्हटले आहे. गेल्या ७० वर्षापासून राज्यात आणि देशात याच धोरमाने राजकारण सुरू असल्याचे सेनेने म्हटले आहे.