मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्त देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्तेत आणण्यात पवारांचा महत्वाचा वाटा आहे. त्याच महाविकास आघाडीचा एक घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील शरद पवारांना पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची स्तुती केली आहे.
काय म्हटले आहे सामनात-
शरद पवार म्हणजे हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेले ८० वर्षाचे व्यक्तिमत्व आहे. मात्र, तरीही त्यांचे वय वाढले नाही असा उत्साह त्यांच्यामध्ये आजही दिसून येतो. पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेते आणि यंशवतराव चव्हाण यांचे राजकीय आणि वैचारिक वारसादार आहेत. आज त्यांचा ८० वाढदिवस आहे. मात्र, पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, अशा संभ्रमात देश पडला असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
अनेकदा तरुण राजकारणी आराम करत असतात तेव्हा शरद पवार महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात, त्यांच्या आजच्या ८० व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला देखील ते देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतीची भेट घेतात, नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांची दुखे समजून घेण्यात पवार आघाडीवर असतात, त्यामुळे पवारांना आज ते ८० वर्षाचे झालेत असे कोण म्हणेल का? अशी स्तुती सामनातून केली आहे.
पवारांना आशीर्वाद देणारे हात नाहीत-
शरद पवारांच्या आजच्या वाढदिवसावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असायला हवे होते. ते असते तर आज त्यांनी वडीलकीच्या नात्याने पवारांना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे हात नाहीत आणि पवार झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत. कारण शरद पवार स्वत:च सह्याद्री बनून देशाचे नेते झाले आहेत. ५० वर्षापेक्षा अधिककाळ संसदीय राजकारणात आहेत. ते सर्वच निवडणुकात अजिंक्य असल्याचे सांगत पवारांच्या तोडीचा नेता देशाच्या राजकारणात नसल्याचे शिवसेनेने अधोरेखीत केले आहे.