मुंबई :सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यातील राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. भाजप नेते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर, आरोपानंतर ईडी, सीबीआय कामाला लागत आहेत, असे चित्र दिसत आहे. यावरून शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
नक्की काय म्हटलंय अग्रलेखात?
''ईडी', 'सीबीआय'सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत व त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो, असे महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे. तसे धमकीसत्र त्यांनी चालवले आहेच. काही झाले की हे लोक फक्त 'ईडी' आणि 'सीबीआय'च्याच नावाने धमक्या देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे, की ''ईडी'शी लढताना तोंडाला फेस येईल''. असे सामनात प्रथम म्हटले आहे.
'चंद्रकांत पाटलांना 'ईडी'चा इतका अनुभव कधीपासून आला?'
'तर, चंद्रकांत पाटलांना 'ईडी'चा इतका अनुभव कधीपासून आला? हसन मुश्रीफ यांच्यावर माजी खासदार सोमय्या यांनी काही आरोप केले आहेत. हे आरोप चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने केले असावेत, अशी मुश्रीफ यांना खात्री आहे. कारण आरोप करणाऱ्या दोघांच्याही तोंडी 'ईडी'चे नाव आहे. मुश्रीफ हे मंत्री आहेत. कोल्हापुरात त्यांचे राजकीय वजन आहे', असे म्हणत सामनात पाटलांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
'कोथरुडमध्ये पाटलांच्याच्या तोंडाला फेस आला'
'कालच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात भाजपचा सुपडा साफ झाला व चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता. निवडणुकांच्या आखाड्यात हे व्हायचेच. प्रश्न तो नसून केंद्रीय तपास पथकांच्या राजकीय गैरवापराचा आहे', असेही सामनात म्हटले.
चंद्रकांत पाटलांचा अहंकार
''ईडी'शी लढताना तोंडास फेस येईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगणे हा अहंकार आहे. ''आमची 'वर' सत्ता आहे, आम्ही काहीही करू शकतो,'' अशी भाषा श्री. पाटील यांनी यापूर्वी अनेकदा केली आहे. ''केंद्रीय तपास यंत्रणांची हत्यारे चालवून आम्ही विरोधकांचे कोथळे काढू, बेजार करू'' ही त्यांची नियत आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हा अहंकार शोभणारा नाही. श्री. शरद पवार यांनी मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी नेमकी तीच खंत व्यक्त केली आहे. पवार एकदम भूतकाळात गेले व म्हणाले, ''त्या काळात अनेकदा वाद झाले. मृणालताई असताना सदनामध्ये अनेकदा वाद व्हायचे. पण ते राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असलेला पाहायला मिळायचा. तो सुसंवाद आज पाहायला मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते''', असे म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
'राजकारण झालंय द्वेषाचं-अहंकाराचं'
'श्री. पवार यांची ही खंत योग्यच आहे. सुसंवाद संपला आहे व राजकारण द्वेषाचे व अहंकाराचे झाले आहे. महाराष्ट्रातील भाजपचे लोक संसदीय लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहेत. राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा, प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून थेट दिल्लीच्या कानात बोटे घालीत आहेत. राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येक जण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. राज्य खिळखिळे करायचे, राज्याची गती रोखायची, बेबंद आरोप करून खळबळ माजवायची हेच त्यांचे धोरण आहे. एखाद्या मंत्र्याने वा घटनात्मक पदावरील व्यक्तीने काही चुकीचे काम केले असेल तर राज्यात त्याबाबत कायदेशीर दखल घेणारी यंत्रणा आहे. पोलीस, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, आर्थिक गुन्हे शाखा, लोकायुक्त त्यासाठी आहेत; पण विरोधी पक्ष थेट 'ईडी' व 'सीबीआय'च्याच बाता मारतात!', असंही सामनात म्हटलंय.