मुंबई : केंद्रातील सत्ताधाऱ्यांची सत्ता नसलेल्या अनेक राज्यात तेथील सरकारविरोधी पक्षाचे राज्यपाल आहे. यामुळे त्या-त्या राज्यातील सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष नेहमी समोर येत आहेत. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप आणि केद्रातील सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला जातो. सामनाच्या आजच्याही अग्रलेखातून केंद्र सरकार, भाजप आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
वाचा, नक्की काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात?
'चिखलफेक भाजप पुढाऱ्यांना बक्षिसी 'झेड प्लस' सुरक्षा'
'देशभरातच एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बरी नाही. अनेक राज्यात नक्षलवादी कारवाया वाढल्या असल्याने गृहमंत्री शहा यांना तातडीने मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी लागली आहे. भाजपविरोधात सरकारे ज्या राज्यात आहेत, तेथे अनेक भाजप पुढारी फक्त चिखलफेक करतात. याची बक्षिसी म्हणून 'झेड प्लस' दर्जाची केंद्रीय सुरक्षा देण्यात आली आहे. प. बंगाल, महाराष्ट्र वगैरे राज्यात हे प्रामुख्याने दिसते. 'सीआरपीएफ'चे शेकडो जवान अशाप्रकारे खास कर्तव्य बजावत आहेत. ही शक्ती राष्ट्रीय सुरक्षेला, जनतेच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरुद्ध लावणे गरजेचे आहे. पण सध्या आपल्या देशात काही वेगळेच घडताना दिसत आहे. सध्याच्या युगात कावळे मोती खात आहेत व हंस दाणे टिपत आहेत',असे म्हणत शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप नेते किरीट सोमय्या आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. कारण, किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत. तर, नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल गरळ ओकली होती. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली.
'उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता का नाही?'
'महाराष्ट्रासह देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकंदरीत घडामोडी पाहता तेच म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी महाराजांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. आत्महत्या की हत्या? हे ठरायचे आहे. पण इतक्या मोठ्या संताचा संशयास्पद मृत्यू हा कुणाला कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा पुरावा वाटत नाही व या विषयावर उत्तर प्रदेश विधानसभेचे खास दोन-चार दिवसांचे अधिवेशन बोलावून चर्चा करावी असेही कोणाला वाटू नये? मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला व आता तिच्या कुटुंबासही धमकावले जात आहे. हे काही चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था याबाबत चिंता वाटते, तशी चिंता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील राज्यपालांना का वाटू नये? की तेथील राजभवनाच्या संवेदना मरून पडल्या आहेत? महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे, की न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे. असे जागरूक महिला महामंडळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात नसावे याची खंत कुणास वाटू नये?', असाही प्रश्न सामनातून करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. यात साकीनाका बलात्कार प्रकरणासंबंधी महिलांच्या सुरक्षेप्रकरणी विशेष दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनीही त्या पत्राला उत्तर दिले आहे. अशी सूचना केद्रातील सत्ताधाऱ्यांना देऊन दोन दिवसांचे संसदीय अधिवेशन घेण्याचे सांगावे, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरादाखल पत्रात म्हटले आहे.
'रेवा आणि साकीनाक्यातील घटनेत काय फरक?'