अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यालयांना टाळे लावून घरी बसा; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसवर निशाणा
काँग्रेस पक्षाच्या आजच्या अवस्थेस फक्त गांधी परिवार जबाबदार नाही, तर गांधी परिवाराच्या कृपेने मोठे वतनदार झालेले लोकच जबाबदार आहेत, हे गेल्या महिनाभरातील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसला एक अध्यक्ष मिळत नाही, काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी त्यांचे मन वळविण्यात काँग्रेसजनांनी एक महिना वाया घालवला.
मुंबई- काँग्रेसकडून सुरू असलेल्या राजीनामा सत्रावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला नेहरू-गांधी परिवार जबाबदार नाही, तर ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसचे मीठ खाल्ले असे सर्वच लोक जबाबदार आहेत. ज्या काँग्रेसला एक महिन्यानंतरही स्वतःचा अध्यक्ष निवडता येत नाही, त्या काँग्रेसने आता कार्यालयांना टाळे लावून कायमचे घरी बसावे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काँग्रेसचे संघटन साफ कोसळले आहे. काँग्रेस कार्यालयाच्या इमारती उभ्या आहेत, पण त्यात ना जान ना हालचाली! प्रमुख विरोधी पक्षांची भूमिका बजावण्यासाठी तरी थडग्यावरील धूळमाती झटकावी असेही त्यापैकी कुणाला वाटत नाही. देशासमोर व लोकांसमोर प्रश्न आहेत. प्रश्न निर्माण होतात तेव्हा जनता आशेने विरोधी पक्षांकडे पाहते, पण काँग्रेस राहुल गांधींच्या पायाकडे पाहत आहे. काँग्रेसला त्याच्या लायकीप्रमाणे योग्य फळ मिळाले आहे याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.
सध्याचा काँग्रेस पक्ष गांधी परिवाराचा छळ करीत आहे असे दिसते. गांधी परिवार तसेच घराणेशाहीच्या सावलीतून (विळख्यातून) काँग्रेसने बाहेर पडावे, असे राहुल गांधी यांनी ठरवले, पण काँग्रेस पक्ष उन्हात उभे राहून काम करायला तयार नाही व ते पुनः पुन्हा त्याच सावलीत जात आहेत. मुंबईतील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आता राजीनामे दिले. मात्र, पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामे दिल्याचे म्हणावे तर मग राजीनाम्यांसाठी इतका वेळ का लागावा? पुन्हा इतर राज्यांतही असेच राजीनामा सत्र सुरू आहे व हा राहुल गांधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. कर्णसिंह यांनी या राजीनामा सत्रावर वेदना व्यक्त केली. ते म्हणतात, ‘‘राहुल गांधी हे एक सच्चे आणि प्रतिष्ठत गृहस्थ आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान व्हावा. त्यांच्यावर निर्णय मागे घेण्यासाठी दबाव टाकणे बरोबर नाही.’’ काँग्रेस पक्षाच्या आजच्या अवस्थेस फक्त गांधी परिवार जबाबदार नाही, तर गांधी परिवाराच्या कृपेने मोठे वतनदार झालेले लोकच जबाबदार आहेत हे गेल्या महिनाभरातील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. काँग्रेसला एक अध्यक्ष मिळत नाही, काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला कोणी तयार नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी त्यांचे मन वळविण्यात काँग्रेसजनांनी एक महिना वाया घालवला.