महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हिंदू-मुसलमान' खेळ मांडणाऱ्यांच्या हाती आयते कोलीत! - सामना मरकज टीका

संपूर्ण देशात कोरोनाचा धोका असताना हजारो लोकांना एकत्र जमा करुन 'मरकज'चे आयोजन केले गेले. यामुळे 'हिंदू-मुसलमान' या प्रकरणाचा खेळ मांडणाऱ्यांना हाती आयते कोलीत मिळाले. धर्माच्या नावाखाली एकत्र जमलेल्या या पाच हजार लोकांनी देशाची आणि समाजाची काय सेवा केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Saamana
सामना

By

Published : Apr 3, 2020, 11:13 AM IST

मुंबई - दिल्लीतील 'मरकज'ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणाऱ्यांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान 'मक्का-मदिने'कडून तरी काही शहाणपण घ्यावे. तिथेही लॉक डाऊन आहे. मग येथे 'मरकज'च्या झुंडी जमा का करता? अशाने इस्लाम खरंच खतऱ्यात येईल हो! असा सल्ला शिवसेनेने मुस्लिम बांधवांना दिला आहे. पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मुस्लिमांमध्ये जागरुकता होत असल्याचे सांगत त्यांचे कानही टोचले आहेत.

संपूर्ण देशात कोरोनाचा धोका असताना हजारो लोकांना एकत्र जमा करुन मरकजचे आयोजन केले गेले. यामुळे 'हिंदू-मुसलमान' या प्रकरणाचा खेळ मांडणाऱ्यांना हाती आयते कोलीत मिळाले. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात १ ते १५ मार्च दरम्यान तबलीगी समाजाच्या 'मरकज' या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जगभरातून पाच हजारांपेक्षाही जास्त लोक एकत्र जमले होते. याच पाच हजारांतील ३८० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा जो आकडा संथ गतीने पुढे जात होता, तोच आकडा अचानक वाढला. अनेकांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढली.

या 'मरकज' प्रकरणाला लागलीच धार्मिकतेचा रंग चढला. कोरोनाचा धुमाकूळ सर्वच धर्मीय आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. असे असताना धर्माच्या नावाखाली एकत्र जमलेल्या या पाच हजार लोकांनी देशाची आणि समाजाची काय सेवा केली, असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे.

मुस्लिम समाज सुशिक्षित होत आहे, मुख्य प्रवाहात येत आहे, असा समज झाला होता. या समजुतीवर याच समाजाने पुन्हा एकदा पाणी फिरवले. दिल्लीत मरकजचा कार्यक्रम झाला नसता तर धर्मावर काय मोठे संकट कोसळले असते? असा प्रश्न केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी वारंवार विनंती करुनही आयोजकांनी गर्दीला थांबवले नाही. जास्त जोरजबरदस्ती करावी तर बिचाऱया पोलिसांच्या माथीच खापर फुटले असते. शेवटी थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा कार्यक्रम रोखण्याची विनंती करण्यासाठी भल्या पहाटे जावे लागले. इतके करुनही आयोजकांचे म्हणने आहे की, पोलिसांनी आणि प्रशासनाने सहकार्य केले नाही. आता हा प्रकार खरा आहे की, खोटा ते आयोजक आणि पोलिसांनाच माहिती. मात्र, जसा शाहीनबाग परिसर रिकामा करुन घेतला, तसा मरकजही रोखता आला असता. हा राष्ट्राच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून कदाचित मुसलमान नेतेही कारवाईमागे उभे राहीले असते.

कोरोनामुळे मक्का-मदिनाही बंद ठेवण्यात आले आहेत. निदान त्यांच्याकडून तरी काही धडा घ्यावा. कोरोना सारखा रोग जाती-पाती, धर्म नाही बघत त्यामुळे निदान आता तरी असला हिंदू-मुसलमान करणाऱयांनी धडा घ्यावा, अशी टीका सामन्यात करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details