मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन आता ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा हा चौथा ट्प्पा आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कितपत होते यात शंकाच आहे. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्प्प्यातच अनेक नागरिक आणि मजूर आपल्या घरी निघाले आहेत. भाजप सरकारने या मजुरांची मदत करायचे सोडून त्यांची सत्ता असलेल्या काही राज्यांनी या मजूरांचा स्वीकार करण्यासही नकार दिला आहे. याउलट विरोधी पक्षातील नेते मजूरांची मदत करत आहेत, तर भाजप मंत्र्यांना मिरच्या झोंबत आहेत. भाजपच्या या धोरणावर सामनात जोरदार टीका करण्यात आली.
सध्याचे चित्र भयावह आहे. एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तर दुसरीकडे मजूरांची ससेहोलपट सुरूच आहे. काँग्रेस नेते राहूल गांधींनी काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या रस्त्यांवर चालणाऱ्या मजूरांसोबत संवाद साधला. त्यांची विचारपूस करून नंतर त्यांची घरी जाण्याची व्यवस्थाही केली. या प्रकरणाची पुरेशी माहिती न घेताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहूल यांच्यावर टीका केली. भाजपचे मंत्री लॉकडाऊन कुरवाळत घरात बसले आहेत आणि दुसरे या मजूरांची मदत करत आहेत तर यांना तेही सहन होत नाही. आपल्याच मजूरांना राज्यात घेण्यास विरोध करणाऱ्यांनी माणुसकीच्या गप्पा करू नयेत असे, सामनातून सुचवण्यात आले आहे.