महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामान्य लोकांच्या मनातील खदखद व त्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारू - रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत प्रत्येकाला काहीतरी दिलेले आहे. पक्षाने कोणावरही अन्याय केलेला नाही. परंतु, जे जात आहेत त्यांच्यामुळे पक्षाला आणि विशेषतः आमच्या महिला प्रदेश संघटनेला कुठलीही हानी पोहोचणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सामान्य लोकांच्या मनातील खदखद आणि त्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार असल्याचेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

By

Published : Jul 29, 2019, 5:23 PM IST

रुपाली चाकणकर

मुंबई- राज्यातील सर्वसामान्य माणसांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड मोठी खदखद निर्माण झाली आहे. हेच सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.

आमचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी रुपाली चाकणकर यांच्यासोबत केलेली बातचीत

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, राज्यात प्रचंड मोठे प्रश्न या सरकारच्या काळात निर्माण झालेले आहेत. ते प्रश्न घेऊनच आम्ही जनतेमध्ये जाणार असून, मी उद्यापासूनच राज्यभरात दौरा करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आज राज्यात मुलींना बस पास साठी आणि शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्या स्वतःचा जीव संपवताहेत, अशी दारुण अवस्था या सरकारने राज्यातील मुलींची केली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात गर्भाशय काढून अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार करण्यात आला. सरकार महिलांचे सबलीकरण आणि सुरक्षेचा गाजावाजा करत असला तरी राज्यात मोठ्या प्रमाणात महिला सुरक्षा आणि महिला सबलीकरणचे प्रश्न गंभीर बनले आहेत. महिलांच्या आरोग्याचा शिक्षणाचा तसेच त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर असून या प्रश्नावर आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पुढे तसे कोणतेही मोठे आव्हान दिसत नाही. ज्यांनी राजीनामा देऊन पक्ष सोडला त्यांच्यामुळे महिला प्रदेशच्या संघटनेमध्ये कुठलीही हानी झालेली नाही. आमची संघटना मजबूत आहे, परत त्यांच्या जाण्याने आम्ही पुन्हा जोमाने काम करू, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून मागील काही दिवसात इतर पक्षात जाणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यासंदर्भात चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत प्रत्येकांना काहीतरी दिलेला आहे. पक्षाने कोणावर अन्याय केलेला नाही. परंतु जे जात आहेत त्यांच्यामुळे पक्षाला आणि विशेषत आमच्या महिला प्रदेश संघटनेला कुठलीही हानी पोहोचणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details