मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांच्या विरोधात एकेरी उल्लेख करून महाराष्ट्राचाही अपमान करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना हिच्या विरोधात आज(मंगळवार) विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाकडून हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला.
काँग्रेसचे भाई जगताप यांनी अर्णब आणि कंगना हिच्या विरोधात तर शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे यांनी अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हा प्रस्ताव मांडत त्यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीसह आक्रमक भूमिका मांडली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सध्या विधानपरिषद हक्कभंग समिती कार्यरत नाही. मात्र, विषय गंभीर असल्याने हा प्रस्ताव स्वीकारत असून पुढे त्यावर काय करायचे याचा निर्णय घेईन असे आश्वासन दिले.
नियम २४० अन्वये काँग्रेचे सदस्य भाई जगताप यांनी अर्णब गोस्वामी, कंगना यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सभापतीकडे सादर केला होता. यावर जगताप म्हणाले, मुंबईत येणारे नायक नायिका या देशाचे वैभव असतात असा आमचा समज होता. परंतु, कंगना हिने तो खोटा ठरवला असा आरोप त्यांनी केला. तसेच कंगनाचे पूर्व आयुष्य वादाचे आहे. पण मुंबईच्या बाबतीत तिने जे वक्तव्य केले ते गंभीर आहे. येथे येऊन हे लोक स्वःतचे बंगले उभे करतात, परंतु कंगनाने महाराष्ट्र आणि मुंबई सोबत गद्दरी केली, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी आक्षेप घेत हा हककभंग कसा होतो, असा सवाल केला. त्यावर सभापतींनी आपण हा प्रस्ताव माझ्याकडे आल्याने मी त्यांना बोलायची संधी देत असल्याचे सांगितले. तर, जगताप यांनी कंगना ही ड्रग कशी घेत होती, याचा दाखला देत त्यामुळे हा हक्कभंग स्वीकारावा अशी मागणी केली. शिवसेनेच्या कायंदे यांनी गोस्वामी यांच्या वाहिनीवर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख, सरकार विरोधात एकेरी टीका, जाणून बुजून आणि दुष्ट बुद्धीने ते अवमान करत असल्याचे म्हटले. तसेच, मुख्यमंत्र्यांवर जाणीवपूर्वक मीडिया ट्रायल चालवला जात आहे. शासनाबद्दल संशय निर्माण होईल असे वातावरण रिपबलिक टीव्ही करत आहे. यामुळे, त्यांच्यावर हक्कभंग स्वीकारावा अशी मागणी केली.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी संविधानाची चौकट कोणालाही मोडता येत नाही. पण अर्णब स्वतः न्यायाधीश झाल्यासारखे वागत आहेत, ते संसदीय लोकशाहीची चौकट मोडीत काढत आहेत. यापूर्वी सभागृहाने अनेक माजलेल्या पत्रकारांना ताळ्यावर आणले आहे, तसे अर्णब यालाही ताळ्यावर आणावे अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे हा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव आहे. महाराष्ट्रावर शब्दिक हल्ला होत आहे. कायदेमंडळ उच्च स्थानी असताना मुख्यमंत्र्यांवर हल्ला होत आहे. यामुळे यामागे कोण आहे, याचाही तपास व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा -रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक