मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खासदारकीचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी विधिमंडळात आंदोलन केले. दरम्यान राहुल गांधी यांच्या प्रतिमेला भाजप आणि शिंदे गटाचे आमदारांनी जोडे मारले. विधानभवनात याचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित विषयांवर आज निवेदन करणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे आमदार यांना दिले होते. या संदर्भात आघाडीचे आमदारांनी आज सकाळी अध्यक्षांची भेट घेऊन विचारणा केली असता, अध्यक्षाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
सरकारचा एककलमी कार्यक्रम - आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीने अधिवेशन काळात शेवटपर्यंत कामकाजात भाग घेतला. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत मदत कशी देता देईल यासाठी प्रयत्न केला. अधिवेशन काळात राष्ट्रीय नेत्यांना जोडे मारण्याचा प्रकार झाला. सभागृहाची प्रथा आणि परंपरा नाही. विधिमंडळाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. तरीही विधिमंडळ परिसरात तीव्र शब्दांत निषेध केला. कोणत्याच राष्ट्रीय नेत्याच्या बाबतीत घडू नये. ज्या आमदारांनी जोडे मारले त्यांना निलंबित करावे, अशी भूमिका घेतली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बैठक घेतली त्यांनी आज निर्णय देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, सभागृहात ज्या ज्या गोष्टी घडल्या. अपमानास्पद शब्द वापरले गेले. संबंधितांवर कारवाई करून विधिमंडळाने अंकुश ठेवावा अशी मागणी केली मात्र अध्यक्षांचा कल योग्य दिसला नाही, असे अजित पवार यांनी म्हणाले.
अजित पवार आक्रमक - तसेच, मराठा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही. एक ओळीचा प्रस्ताव दिला. मराठावाड्यावर यामुळे अन्याय होईल. त्यामुळे चर्चा करायची नसल्यास दोन दिवसांचे अधिवेशन घ्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नकार देत समिती नेमल्याच सांगितले. उलट तत्कालीन सरकारने ठाकरे मुख्यमंत्री असताना समिती नेमली होती. सकारात्मक गोष्टींवर सरकारला बोलायला वेळ नाही. त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.
पायताने आमच्याकडे सुद्धा -विधानभवनात आंदोलन कसे असावे याचे नियम घालून दिले आहेत. परंतु, दुर्दैवी अशी कृती सत्ताधाऱ्यांकडून झाली. हा प्रकार निषेधार्थ आहे. आज सरकार असले तरी आमच्याकडे पायताने आहेत, हे विसरू नका, असा इशारा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला. कारवाईबाबत आज निर्णय देण्याचे विधानसभा अध्यक्षानी ठरवले. त्यानुसार निरपेक्ष राहून निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, अध्यक्ष टाळाटाळ करत असल्याचे थोरात यांनी सांगत सरकारच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामबाबत भूमिकेवर टीका केली.