मुंबई -ओबीसी आरक्षणासाठी रविवारी (दि. 7 जुलै) मुंबईसह राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिका पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी घेतली आहे. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाविरोधात आज मानखुर्द परिसरात चक्काजाम आंदोलन केले आहे.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
ओबीसींच्या आरक्षणासाठी महादेव जानकर यांच्या नेतृत्वात रासपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मानखुर्द येथे प्रचंड चक्काजाम आंदोलन केले. यावेळी रासपचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलकांनी वाहतूक कोंडी केल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलन आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांनी जानकर यांच्यासह त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही. एनडीए असो की यूपीए ओबीसींना न्याय हक्क मिळाला नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसल्याचे जानकर यांनी म्हटले आहे.