महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर महाराष्ट्रातील गारपीट ग्रस्तांसाठी साडेआठ कोटी रुपये मंजूर; वाचा, कोणत्या जिल्ह्याला किती निधी? - hailstorm victims in North Maharashtra compansation

एप्रिल-मे महिन्यात उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान झालं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साडेआठ कोटी रुपये निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.

mantralaya
मंत्रालय

By

Published : Nov 2, 2021, 6:01 PM IST

मुंबई -राज्यात एप्रिल आणि मे महिन्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाली. या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणेबाबतचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरीही दिली होती. त्यानुसार नाशिक विभागाकरिता साडेआठ कोटी रुपये विभागीय आयुक्तांच्या मागणीनुसार वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कोठे झाले नुकसान?

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक विभागामध्ये मार्च ते मे २०२१ दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्याप्रमाणात केळी तसेच अन्य पिकांचं नुकसान झालं. या नुकसानीसाठी मदत म्हणून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या नियमानुसार मदत देण्याची मागणी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे केली होती. या विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले होते. सर्वाधिक नुकसान जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात झाले होते.

काय आहेत निकष?

एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या मदतीच्या दरानुसार ही मदत देण्यात येते. प्रचलित नियमानुसार शेती आणि बहुवार्षिक फळपिकाच्या नुकसानीकरिता ३३ टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्यांना ही मदत मिळते. प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानूसार जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानूसार मदतीचे वाटप केले जाणार आहे. ही रक्कम थेट संबंधित बाबी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही बाधितांना रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत करण्यात येणार नाही. दरम्यान, पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम खात्यावर थेट जमा करताना मदतीचा रकमे मधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

विभागीय आयुक्तांनी मागणी केल्यानुसार साडे आठ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यानुसार सर्वाधिक जळगाव जिल्ह्याला मदत मिळणार आहे जळगाव जिल्ह्याला 6 कोटी 66 लाख रुपये त्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्याला एक कोटी 84 लाख रुपये तर धुळे जिल्ह्याला दोन लाख 88 हजार रुपये नंदुरबार जिल्ह्याला एक लाख 65 हजार रुपये आणि अहमदनगर जिल्ह्याला 1 लाख 60 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details