मुंबई - दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या गुजरातमधील अवघ्या साडे पाच महिन्यांच्या धैर्यराजला अमेरिकेहून मागवण्यात आलेले 16 कोटी रुपयांचे ‘झोलजेन्स्मा’ इंजेक्शन देण्यात आले. हा चिमुरडा सध्या मुंबईतील माहिमच्या पी. डी. हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहे. धैर्यराजला बुधवारी सकाळी ११ वाजता इंजेक्शन हे देण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. या चिमुकल्याला आज(गुरुवारी) रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाच्या चाईल्ड न्युरोलोजिस्ट डॉ. निलू देसाई यांनी ईटीव्ही भारताला दिली.
७१ दिवसात उभारली निधी -
गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या राजदीप सिंह राठोर यांचा पाच महिन्याचा मुलगा धैर्यराज एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. धैर्यराजला स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी (एसएमए) हा आजार झाला होता. या चिमुकल्याच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. धैर्यराज पालकांनी आपल्या मुलांचे प्राण वाचविण्यासाठी समाज माध्यमांवर मदत करण्याचे आवाहन करून 'क्राऊड फंडिंग'ची मोहीम चालवली. त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अवघ्या ७१ दिवसांत १६ कोटी २४ लाख ३५ हजार ६५५ रुपये जमा झाले. या क्राऊड फंडिंगमध्ये धैर्यराजच्या मदतीला २ लाख ६४ हजार ६६० नागरिक समोर आले आहे. त्यामुळे धैर्यराजचे प्राण वाचले आहेत. धैर्यराजच्या आई-वडिलांनी मदत करणाऱ्या लाखो दात्यांचे आभार मानले आहेत.