मुंबई:कुटूंबीयांसोबत भांडणे होणे, बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा आदी कारणाने लहान मुले आपल्या घरातून पळून जातात. यामधील काही मुले मुंबईमध्ये येतात. मुंबईमध्ये आलेली मुले घर आसरा नसल्याने प्लॅटफॉर्मवर राहतात. तर काही रेल्वेमधून फिरत असतात. अशा मुलांची आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या पोलिसांकडून विचारपूस केली जाते. त्यांची माहिती मिळवली जाते. त्यांच्या कुटूंबीयांशी संपर्क साधून त्या मुलांना त्यांच्या ताब्यात दिले जाते. ज्या मुलांचे कुटुंबीय नसतात अशा मुलांना लहान मुलांसांठी काम करणाऱ्या चाईल्ड लाईन या एनजीओच्या ताब्यात दिले जाते. या मोहिमेला ऑपरेशन नन्हें फरिश्ते असे नाव देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.
९७५ मुलांना दिले ताब्यात: ऑपरेशन नन्हे फरिश्तेच्या माध्यमातून ग्लॅमर, चांगले राहणीमान, घरातील भांडणे यामुळे घरापासून दूर झालेली मुंबई रेल्वेच्या हद्दीत ६५० मुले आणि ३२५ मुली अशा एकूण ९७५ मुलांना घरच्यांच्या तसेच एनजीओच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही मुले प्लॅटफॉर्मवर मिळून आली आहेत. तसेच काही मुले रेल्वेच्या हद्दीत सीसीटीव्हीमध्ये दिसली आहेत. अशा मुलांची माहिती मिळवून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना घरच्यांच्या तसेच एनजीओच्या ताब्यात देण्यात आले अशी माहिती ठाकूर यांनी दिली.