मुंबई - टॅक्सी चालकावर अनैसर्गिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलला मुंबई पोलिसांच्या एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ जानेवारीला रात्री ११ ते १ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरपीएफ कॉन्स्टेबलला अटक केली आहे.
मुंबईतील पी. डिमेलो रोडवर कर्तव्यास हजर असलेल्या आरोपी आरपीएफ कॉन्सटेबलने पी.डिमेलो रोडवर उभ्या असलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला ग्रँट रोड येथील रेडलाईट परिसरात नेण्यास सांगितले. मात्र, या वेळेस सदर पीडित टॅक्सी ड्रायव्हरने भाडे नाकारले असता, आरपीएफ कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला मारहाण करत पी. डिमेलो रोडवर असलेल्या एका अज्ञातस्थळी नेले व तिथे त्याच्यावर अनैसर्गिक बलात्कार केला. यानंतर आरोपी कॉन्स्टेबलने पीडित टॅक्सी चालाकाकडील मोबाईल व रोख रक्कम घेऊन जागेवरून पळ काढला.