मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना अपयश आले. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याबाबत ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया रोहित पवारांना का येथून निवडणूक लढवयाचीयं...
कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांच्यापुढे अहमदनगरचे विद्यमान पालकमंत्री राम शिंदे यांचे आव्हान असणार आहे. मात्र, रोहित पवार यांनी या मतदारसंघात नियोजनबद्ध यंत्रणा राबवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते या मतदारसंघात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले रोहित पवार..
कर्जत-जामखेड मतदारसंघातून आपली उमेदवारी निश्चित मानली जातेय, तशी पक्षाकडे आपण मागणीही केली आहे काय सांगाल?
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षांच्या माध्यमातून उमेदवारीची मागणी केली आहे. बऱ्याच दिवसांपासून मी या मतदारसंघात काम करतोय. बऱ्याच लोकांच्या भेटी-गाठीही घेतल्या आहेत. मतदारसंघातील अनेक लोकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडेही माझ्या उमेदवारीची मागणी केल्याचे रोहित पवार म्हणाले.
कर्जत-जामखेड हाच मतदारसंघ का निवडला?
या मतदारसंघात काम करण्यासारखे बरेच विषय आहेत. शेतीसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी हे विषय महत्वाचे आहेत. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा आहेत. तसेच बससेवेच्या सुविधा अपुऱ्या आहेत. आरोग्याच्या सवुधेचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींवर काम करण्यासाठी या मतदारसंघाची निवड केली आहे.
निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आपण कशी तयारी सुरू केलीय?
लोकांशी संवाद हेच निवडणुकीच्या तयारीचे मोठे वैशिष्ट्य आहे. या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, लोकांना भेटणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे सध्या सुरू आहे.