मुंबई- अजित पवार परततील याचा आम्हाला विश्वास होता. जे काही घडले ते कशामुळे घडले, का घडले हे माहीत नाही. अजित पवार आमचेच आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते परत येतील याचा विश्वास होता. कुटुंबातील आहेत म्हणून ते परतल्याचा आनंद झाला. त्यापेक्षा अधिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आनंद झाला, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले.
नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी पार पडत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे विधानभवनात दाखल झाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा - विधानभवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागताला दारातच उभ्या होत्या.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली असल्याचे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.
हेही वाचा - तिन्ही पक्षांचा समान कार्यक्रम ठरला; आता एकोप्याने काम करणार - अशोक चव्हाण