मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. (President of Maharashtra Cricket Association). पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत आज रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देशाच्या आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. राजकारणासोबतच देश आणि राज्य पातळीच्या क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी अनेकांना चितपट केल्याचा इतिहास आहे. यावेळीही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी नेमकं कोण बसणार? याबाबत क्रिकेट पासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू होत्या. मात्र आता त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
Rohit Pawar : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांचे बिनविरोध निवड - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. (President of Maharashtra Cricket Association). रोहित पवार यांची शरद पवार यांच्या गटाकडून असोसिएशनच्या निवडणुकीत एन्ट्री झाली होती.
शरद पवार यांच्या गटाकडून एन्ट्री : शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी गेले काही महिने जबरदस्त तयारी केली होती. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजप कडून देखील तेवढीच तयारी झालेली पाहायला मिळाली. भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदावर आपल्या गटाकडून अध्यक्ष निवडून यावा यासाठी काही महिन्या आधीपासूनच मोर्चे बांधणी सुरू केली होती. मात्र नंतर पवार आणि भाजप एकत्र आल्याने सर्वच राजकीय नेत्यांना आणि खेळाडूंना धक्का बसला होता. याच वेळी रोहित पवार यांची शरद पवार यांच्या गटाकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एन्ट्री झाली होती.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रोहित पवार यांनी सर्वांचे धन्यवाद मानले. क्रिकेटपटूंसाठी काम करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. तसेच उपाध्यक्षपदी निवड झालेले सहकारी किरण सामंत, सचिव शुभेंद्र भांडारकर, खजिनदार संजय बजाज व सह सचिव संतोष बोबडे यांचंही त्यांनी अभिनंदन केलं.