मुंबई Rohit Pawar Criticism BJP:खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. शरद पवारांच्या आदेशाने हा पक्ष चालत असतो. जे नेते शरद पवारांना, पुरोगामी विचारांना सोडून भाजपासोबत गेले आहेत ते स्वतःच्या आदेशावर चालत नाही; मात्र भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या आदेशावर चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातील काही नेत्यांनी आदेश दिला असेल की, (Rohit Pawar) तुम्ही काही आमदारांना अपात्र करा. तसं पत्र त्यांनी 'इलेक्शन कमिशन'ला दिलं असावं. निवडणूक आयोग हे भाजपाच्या हातातील एक बाहुलं आहे. त्यामुळे ते कोणाच्या बाजूने निर्णय देईल याचा काही अंदाज आपल्याला आला आहे. मात्र, जेव्हा हा विषय न्यायालयात जाईल त्यावेळेस निर्णय मात्र शरद पवारांच्याच बाजूने लागेल हे आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
पवार आणि पटेलांचा फोटो व्हायरल :शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी तो फोटो कुठेही टाकलेला नव्हता. तो ज्या व्यक्तीने टाकला त्यांनाच विचारा की, तो फोटो का टाकला? फोटोच्या माध्यमातून 'परसेप्शन' तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा कोणताही फायदा त्यांना होणार नाही. लोकांना सर्व कळते असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
एक प्रकारे ब्लॅकमेलिंगच :जनतेच्या हिताची एखादी योजना असेल सरकार कोणाच्या विचारांचे आहे याचा विचार न करता सरकारमधील मंत्र्यांनी जनतेच्या विकासाच्या कामांना झुकते माप देऊन सह्या केल्या पाहिजे आणि विकासकामे मार्गी लावली पाहिजे. मात्र, आता नवीन प्रथा सुरू झाल्याचं समजतंय. तुम्ही आमच्या बाजूला या, नाहीतर आमच्या बाजूचे असल्याचं प्रतिज्ञापत्र द्या. मग तुमचं काम करू. त्यामुळे काही आमदारांना पर्याय राहात नाही. शेवटी स्वाभिमान टिकला पाहिजे जपला पाहिजे, अशी भूमिका आम्ही सर्वजण घेत असतात. तर काही लोक तात्पुरता विचार करतात. त्यामुळे काही जण कदाचित प्रतिज्ञापत्रावर काम करत असतील. प्रतिज्ञापत्र देत असेल तर काम करेल. साध्या भाषेमध्ये याला कुठेतरी 'ब्लॅकमेलचं' म्हटलं जात असल्याचं आमदार रोहित पवार म्हणाले आहे.