महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवभोजन थाळी'ची व्याप्ती वाढवावी, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोहित पवारांची मागणी - competition exam in pune

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा मोठा विद्यार्थी वर्ग हा पुण्यामध्ये आहे. त्या विद्यार्थ्यांचे सध्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांचे हाल होऊ नये म्हणून 'शिवभोजन थाळी'ची व्याप्ती वाढवून ताटांची संख्या वाढवावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Rohit pawar
आमदार रोहित पवार

By

Published : Mar 21, 2020, 1:45 PM IST

मुंबई - जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्येही वाढताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शालेय परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा मोठा विद्यार्थी वर्ग हा पुण्यामध्ये आहे. त्या विद्यार्थ्यांचे सध्या जेवणाचे हाल होत आहेत. तसेच हातावर पोट असलेल्या कामगारांचेही हाल होत आहेत. त्यासाठी 'शिवभोजन थाळी'ची व्याप्ती वाढवून ताटांची संख्या वाढवावी. तसेच गर्दी होऊ नये म्हणून दोन वेळा शिवभोजन थाळी द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

स्पर्धा परीक्षेचे हजारो विद्यार्थी पुण्यात असंख्य अडचणींना तोंड देत आहेत. ५ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेचा फेरविचार करण्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सांगितले आहे. तरी याबाबत त्वरित स्पष्ट निर्णय घेतल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

प्रवास टाळावा

शहरात सोय असलेल्या लोकांनी गर्दीमुळे प्रवास टाळावा. पण गैरसोयीमुळे गावाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने ट्रॅव्हल एजंट अवाजवी भाडे घेऊन त्यांची लूट करत आहेत. याकडे परिवहनमंत्री अनिल परब यांनी लक्ष देऊन या लुटारुंवर कारवाई करावी, अशी विनंतीही रोहित पवारांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details