वसई - सलग दुसऱ्या दिवसी मुसळधार पावसाने ( Heavy rain ) सातत्य कायम ठेवल्याने वसई- विरारमधील सखल भागांत ( Vasai Virar areas ) पाणीच- पाणी साचलेले पहायला मिळतं आहे. विरार पश्चिमेचा विवा कॉलेजजवळचा परिसर, तिरुपती नगर, बोळींज- जकात नाका नेहमीप्रमाणेच पाण्याखाली गेला आहे, तर नालासोपारा आचोळे रोड, सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी आणि अन्य परिसरात पुन्हा पाणी साचल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. नालासोपारा अवधूत नगर, शिवाजी नगर, संभाजी नगर आणि परिसरातील औद्योगिक परिसरातही या पावसाचे परिणाम दिसून आले आहे.
नादुरुस्त रस्ते, उघडी गटारे आणि नियोजनाचा अभाव असल्याने या परिसरातील सखल भागात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. याचे परिणाम म्हणून शाळकरी मुले आणि महिलांना याच पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत होते. औद्योगिक वसाहतीत माल वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्गावर परिणाम झाला आहे.