मुंबई- मुंबईत पावसाळ्यात चांगले रस्ते नसतात, रस्त्यांवर खड्डे पडतात अशी, टीका पालिकेवर दरवर्षी होते. यासाठी पालिकेकडून पावसाळा संपल्यावर रस्त्यांची कामे केली जातात. मागील वर्षी पालिकेने ऑक्टोबर महिन्यात १ हजार ३७८ रस्त्यांची दुरुस्ती कामे हाती घेतली होती. त्यापैकी ७ महिन्यात २३९ कामे पूर्ण केली असून ५०६ कामे प्रगतीपथावर आहे. मात्र, अद्यापही ६३३ रस्त्यांची कामे सुरु झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांना यंदा तरी चांगले रस्ते मिळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
मुंबईतील ६३३ रस्त्यांची कामे रखडली, ५०६ कामे प्रगतीपथावर - मुंबई
मागील वर्षी पालिकेने ऑक्टोबर महिन्यात १ हजार ३७८ रस्त्यांची दुरुस्ती कामे हाती घेतली होती. त्यापैकी ७ महिन्यात २३९ कामे पूर्ण केली असून ५०६ कामे प्रगतीपथावर आहे.
मुंबईमध्ये पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाला म्हणजे ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाते. सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती कामे जोरात सुरु आहेत. सन २०१८ मध्ये मुंबईतील १ हजार ३७८ रस्ते पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणार होते. यामध्ये ७२५ रस्ते, १८ जंक्शन आणि मागील वर्षातील ६३५ कामांचा समावेश आहे. मन्चरजी जोशी रोड, मोरलँड रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, एस.व्ही.रोड, चर्च पाखाडी रोड, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, माहूल रोड आणि एलबीएस या महत्वाच्या रस्त्यांची कामे पालिकेने हाती घेतली होती. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार ५२० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तरीही रस्ते विभागाकडून ७ महिन्यांत केवळ २३९ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. तर ५०६ ठिकाणची कामे सुरु असून लवकरच पूर्ण होतील, असे प्रशासनाने सांगितले आहे.
दुरुस्तींची कामे टप्प्या-टप्प्याने पूर्ण केली जात आहेत. नियोजित वेळेत कामे पूर्ण करण्याचे धोरण आहे. त्यामुळे ज्या कामांना परवानग्या मिळाल्या आहेत, त्यांची दुरुस्ती कामे सुरु आहेत. वाहतूक विभागाने नुकतेच ६२६ रस्त्यांच्या दुरुस्ती कामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच ही कामे हाती घेतली जातील, असे रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.