मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने रियाचा जामीन अर्ज फेटाळत तिला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एनसीबी कार्यालयात रात्र घालवल्यानंतर आज रियाची रवानगी भायखळ्याच्या तुरुंगात करण्यात आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनवरून रियाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ( एनसीबी) कोर्टात रात्री हजर केले. रियाचे वकिल सतीश माने शिंदे यांनी, रियाने ड्रग्ज घेतले नसल्याचे सांगितलं. कुणाच्या तरी सांगण्यावरुन तिने ड्रग्ज मागवले असल्याचे सांगत, रियाला जामीन दिला पाहिजे, असे मत नोंदवले. जामीन मिळाल्यावर रिया चौकशीत पूर्ण सहकार्य करेल, असेही माने शिंदे यांनी कोर्टात सांगितले.
यावर एनसीबीने रिया ही सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील आरोपी आहे. जामिनावर तिची सुटका केल्यास या प्रकरणावर परिणाम होऊ शकतो, असे म्हणणं कोर्टात सादर केले. तसेच रियाने अनेक महत्त्वाच्या गोष्टी चौकशीत उघड केल्या आहेत. यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, असे एनसीबीकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आले.