मुंबई:अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात ६ उमेदवार होते. या सर्व उमेदवारांची अमानत रक्कम ही जप्त झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील रंगत संपली होती. परंतु भाजपकडून नोटा बटण दाबण्यासाठी मतदारांना पैशाचे आमिष दाखविले जात असल्याचा आरोप शिवसेना माजी मंत्री व आमदार अनिल परब यांनी केल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत सर्वत्र उत्सुकता होती. ऋतुजा लटके यांना एकूण ६६५३० मते भेटली तर त्यांच्या पाठोपाठ नोटाला १२८०६ मते भेटली आहेत.
ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय -अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण ३१.७४ टक्के मतदान होऊन एकूण ८६५७० मतदारांनी मतदान केले होते. त्याची मतमोजणी आज झाली.मतदान मोजणीच्या एकूण १९ फेऱ्या झाल्या व या सर्व फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके यांचच वर्चस्व राहिले. ऋतुजा लटके यांना या १९ फेऱ्या व टपाल मतदान या मधून एकूण ६६५३० मते भेटली. तर त्यांच्या खालोखाल नोटा (एकही उमेदवार पसंत नाही) यास १२८०६ मते भेटली. यामुळे या निवडणुकीत ऋतुजा लटके यांचा ५३७२४ मतांनी विजय झाला आहे.