मुंबई -राज्य परिवहन महामंडळाच्या नोकऱ्यांमधील खुल्या जागांवर विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मागास प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमुळे 'रोस्टर' पूर्ण झाल्याने एसटीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकरभरती बंदीचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः मराठवाडा प्रदेशात गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.
केवळ 20 टक्के जागा भरल्या
इतर शासकीय विभागातील नोकऱ्यांप्रमाणे एसटीमध्येही आरक्षण आहे. अनुसूचित जातीसाठी 13 टक्के राखीव जागा आहेत. तसेच
अनुसूचित जमाती 7 टक्के, विशेष मागासवर्ग 2 टक्के, विमुक्त जाती व जमाती 11 टक्के, इतर मागासवर्ग 19 टक्के तर खुल्या वर्गासाठी 48 टक्के आरक्षण आहे. सध्या महामंडळात 36 हजार 388 चालक, 30 हजार 183 वाहक, 7 हजार 933 सहायक याशिवाय यांत्रिकी कर्मचारी, वाहतूक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी व अधिकारी, असे एकूण 97 हजार कर्मचारी व इतर कार्यरत आहेत. खुल्या प्रवर्गासाठीच्या 48 टक्के जागांपैकी मराठवाड्यातील बहुतेक विभागात आतापर्यंत केवळ 20 टक्के जागा भरल्या आहेत, अशी माहिती एसटीतील एका बड्या अधिकाऱ्याने दिली.
मागास घटकातील कर्मचाऱ्यांची 'सेटलमेंट'..?
एसटीमध्ये अलीकडे 2018-15, 2016-17 व 2018-19 अशी तीन वेळा नोकरभरती झाली आहे. त्यामध्ये विशेषत: चालक, वाहक व सहायक यांचा समावेश होता. ही भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक उमेदवार मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांमधून भरती झाले होते. पण, नोकरी लागल्यानंतर यामधील अनेक उमेदवारांनी आप-आपल्या जिल्ह्यांमध्ये बदल्या करून घेतल्या आहेत. रोस्टरप्रमाणे मराठवाड्यातही खुल्या वर्गांसाठी 48 टक्के जागा राखीव आहेत. मात्र, या विभागात खुल्या वर्गाचे आतापर्यंत केवळ 20 टक्के रोस्टर पूर्ण झाले आहे. वैयक्तिक व कौटुंबिक कारणे सांगून तसेच राजकीय नेत्यांच्या शिफारशी आणून मराठवाडा विभागात विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांनी बदल्या करून घेतल्या आहेत. मागासवर्गीयांचे रोस्टर या आधीच पूर्ण झाल्यामुळे खुल्या वर्गासाठीच्या उर्वरित 28 टक्के जागांवर विविध मागास घटकातील कर्मचाऱ्यांची 'सेटलमेंट' केली आहे.
नोकरभरतीचा मार्ग खडतर
सध्या मराठवाड्यातील खुल्या जागांचे रोस्टर अशा पद्धतीने 'पूर्ण' झाल्यामुळे भविष्यात खुल्याप्रवर्गातील उमेदवारांसाठी एसटीच्या नोकरभरतीचा मार्ग खडतर झाला आहे, अशी भीतीही या अधिकाऱ्याने व्यक्त केली. मराठवाड्यातील रोस्टरप्रमाणे खुल्या वर्गाचा कोटा अगोदरच भरला असल्यामुळे स्थानिक खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना नोकर भरतीसाठी इतर जिल्ह्यात म्हणजेच कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत आहे. नोकर भरतीनंतर तेही इतरांप्रमाणे आपल्या जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्न करतात. पण, रोस्टर अगोदरच पूर्ण झाल्यामुळे बदलीसाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा -महामंडळाची मालमत्ता ताब्यात घेऊन एसटी कामगारांना न्याय द्या; संघर्ष एसटी कामगार युनियनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी