मुंबई :इंडियन आयडॉल हा अनेक वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यातून गायक गायिकांचा शोध घेणारा सांगीतिक रियालिटी शो आहे. यावेळेस त्याचा १३वा सिझन सुरु होता. नेहमीप्रमाणे यातून उत्तमोत्तम गायकी अनुभवायला मिळाली. संगीतक्षेत्रातील अनेक आघाडीचे कलाकार, संगीतकार हा शो इमानेइतबारे फॉलो करीत असतात. त्यातील उत्तम गायकांना पार्श्वगायनाची संधी देत असतात. गेले ८-९ महिने सुरु असलेला इंडियन आयडॉल सिझन १३ चा फिनाले नुकताच पार पडला. ऋषी सिंह यावेळी इंडियन आयडॉल १३ च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला. त्याला झगमगती ट्रॉफी, रोख २५ लाख रुपये मिळाले. मारुतीतर्फे एक नवीकोरी ब्रीझा कार भेट देण्यात आली.
अटीतटीची स्पर्धा :इंडियन आयडॉल सिझन १३ मधील ६ स्पर्धकांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. कारण सर्वच स्पर्धक उत्तम गाणारे होते. कोलकाता येथील बिदिप्ता चक्रवर्ती, सोनाक्षी कर आणि देबोस्मिता रॉय या मुली तर जम्मू काश्मीरचा चिराग कोतवाल, वडोदरा येथील शिवम सिंह आणि अयोध्या येथील ऋषी सिंह ही मुले फिनालेचा भाग होते. रविवारी रंगलेल्या अंतिम फेरीत कार्यक्रम सादर करण्यात आले. पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या इंडियाज बेस्ट डान्सरचे जज गीता कपूर, टेरेन्स लुईस आणि सोनाली बेर्डे येथे हजेरी लावून होते. इंडियन आयडॉल १३ चे जज विशाल ददलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कर स्पर्धकांचे मनोबल उंचावताना दिसत होते.
ट्रॉफीवर विजय :इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकणे हे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न असते. यावेळी ऋषी सिंहचे स्वप्न पूर्ण झाले. देबोस्मिता रॉय दुसऱ्या क्रमांकावर होती, तर तिसऱ्या स्थानावर चिराग कोतवाल आला. चवथ्या नंबरवर बिदिप्ता चक्रवर्ती तर पाचव्या आणि सहाव्या नंबरवर आले शिवम सिंह आणि सोनाक्षी कर हे आहेत. इंडियन आयडॉल १३ च्या ट्रॉफीवर विजय मिळाल्यावर ऋषी सिंहच्या आनंदाला पारावर उरला नाही.