मुंबई :तुम्ही अंधेरी, वांद्रे या भागात फिरत असाल तर कदाचित तुम्ही रिक्षा पाहिली असेल. या रिक्षावाल्यांचे नाव आहे सत्यवान गीते. मुंबईच्या कुर्ला पश्चिम भागात राहणारे सत्यवान गीते हे कलाकार आहेत. गीते यांच्या डोक्यात नेहमीच काही ना काहीतरी सुरू असते. आपल्या रिक्षाला आणखी कसे सुंदर बनवता येईल? रिक्षात आणखी काय बदल करता येतील? याचाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. विशेष म्हणजे, हे फक्त रिक्षाला सुंदर बनवत नाहीत तर ते आपल्या रिक्षावर काही सामाजिक संदेशसुद्धा लिहीत असतात. सध्या त्यांनी वाहतूक नियमांबाबत संदेश आपल्या रिक्षावर लिहिला आहे.
कसे सुचले हे सगळे?ईटीव्ही शी बोलताना सत्यवान सांगतात की, 1996 पासून त्यांंनी मुंबईत रिक्षा चालविणे सुरू केले आणि आतापर्यंत अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सोडले. सुरुवातीला तेसुद्धा इतर रिक्षावाल्यांसारखाच रांगेत असायचे. इच्छित भाडे मिळत नव्हते. त्यातच घरची परिस्थिती कठीण. त्यामुळे काहीतरी वेगळे करायचे हे त्यांना सुचले. शिक्षण नसल्याने जॉब कोणता करायचा हा त्यांच्यापुढे प्रश्नच होता. मात्र, ते उत्तम ड्रायव्हर होतो. जॉब करण्यापेक्षा आपली जी रिक्षा आहे त्यातच काहीतरी वेगळे करायचे त्यांना सुचले. तेव्हा त्यांना रिक्षा सजवण्याची संकल्पना सुचली.
स्वतःच सजवली रिक्षा :पुढे बोलताना सत्यवान सांगतात की, आता रिक्षा सजवायचे म्हटले की खर्च आलाच आणि मुंबईत तुम्हाला खर्च हा जपून करावा लागतो. त्यात मी कलाकार माणूस. मग म्हटले एखाद्या कारागिराला पैसे देण्यापेक्षा आपणच रिक्षा सजवली तर काय वाईट? मग लागलो कामाला. सुरुवातीला मी रिक्षात हिरव्या रंगाचे कार्पेट मारले ज्याला रेडीमेड लॉन देखील म्हणतात. गालीच्या मी स्वतःच लावला आणि मग हळूहळू एकेक काम करत गेलो. आता मी रिक्षामध्ये कुंड्या देखील ठेवल्या आहेत. ज्याला फुल येतात. रिक्षात बसल्यावर लोकांना प्रसन्न वाटतं."