मुंबई- लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरित मजूर, कामगार व नागरीक आपल्या राज्यात जाण्यासाठी परतीच्या वाटेवर निघाले आहेत. कोणी पायी प्रवास करत, तर कोणी रेल्वेने प्रवास करत आहे. त्यात आता या स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी रिक्षाचालकही पुढे आले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांना मुंबई बाहेर व परराज्यात जाण्यासाठी ऑफलाईन परवानगी देण्यात यावी, अशी मागणी टॅक्सीमन युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रास यांनी परिवहन विभागाकडे केली आहे.
परिवहन विभागाकडून रिक्षा टॅक्सी चालकांना ऑनलाईन तात्पुरती आणि विशेष परवानगी देण्यात येते. त्यानुसार आता अनेक रिक्षा चालक त्पुरती परवानगी घेऊन आपल्या गावी जात आहेत. मात्र, अनेक रिक्षा टॅक्सी चालकांकडे स्मार्ट फोन व संगणक नाहीत, त्यात लॉकडाऊनमुळे सायबर कॅफे बंद आहेत. तरी परिवहन विभागाकडे अपुरा कर्मचारी आहे. त्यामुळे ऑनलाइन परवानगी ऐवजी ऑफलाईन परवानगी देण्याचा विचार परिवहन विभागाने करावा, असे क्वाड्रास यांनी म्हटले आहे.