मुंबई -सुशांतसिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात आज रिया व शोविक यांच्यासह सहा आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी आता मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे, या अर्जावर उद्या (23 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
यापूर्वी 11 सप्टेंबरला मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने रिया, शौविक व इतर आरोपींच्या जामीन याचिका फेटाळल्या होत्या. सुशांत सिंह प्रकरणाने अमली पदार्थांकडे वळण घेतल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकाने रिया चक्रवर्ती यांना 8 सप्टेंबरला अटक केली होती. यापूर्वी, त्याच्याकडे अनेकदा रियाची चौकशी करण्यात आली.
रियाने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तिला या प्रकरणात गुंतवले जात आहे व ती निर्दोष आहे. रियावर नारकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा 1985 च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूचे कोडे सोडवण्यासाठी अमली पदार्थाचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान एनसीबीला महत्त्वाच्या सुगावा लागला आहे. आतापर्यंत एनसीबीने 17 हून अधिक जणांना अटक केली आहे.