मुंबई -सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे. सुशांतच्या तीन कंपन्यांच्या संदर्भात आर्थिक व्यवहार झाले होते. या आर्थिक व्यवहारात संशय असल्याने ईडीकडून यासंदर्भात सुशांतसिंह राजपूतचा चार्टर्ड अकाऊंटंट, त्याचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, त्यानंतर रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांची चौकशी केलेली आहे. यानंतर पुन्हा एकदा रिया चक्रवर्ती हिला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात दाखल झाली आहे. तिच्यासोबत शोविक चक्रवर्ती व वडील इंद्रजित चक्रवर्ती देखील आहेत.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
अभिनेता सुशांतसिंह राजपूतने काही दिवसांपूर्वी मुंबईतील वांद्रे येथील घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. मात्र, त्याने आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप समजू शकले नव्हते. त्यासाठी विविध अंगानी तपास केला जात आहे. तसेच सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आता तिची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ती आज दुसऱ्यांदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे.
![सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल sushant singh rajput suicide case rhea chakraborty ED inquiry sushant singh rajput suicide investigation सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण रिया चक्रवर्ती ईडी चौकशी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8361468-thumbnail-3x2-as.jpg)
यापूर्वी झालेल्या चौकशीमध्ये रिया चक्रवर्ती हिने स्पष्ट केले होते की, सुशांतच्या संदर्भात कुठलीही गोष्ट तिने स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतलेली नव्हती. सुशांतचा पैसा आपण आपल्या स्वतःच्या वापरासाठी वापरला नसल्याचे तिने सांगितले होते, तर दुसरीकडे ज्या काही गोष्टी आजपर्यंत रियाने कमावल्या आहेत, ज्यात मुंबईत एका फ्लॅटचा समावेश आहे. ही सर्व संपत्ती तिने तिच्या स्वतःच्या पैशातून विकत घेतल्याचे ईडी अधिकाऱ्यांना स्पष्ट केले आहे. यानंतर ईडी अधिकाऱ्यांनी रिया चक्रवर्तीकडे तिच्या गेल्या पाच वर्षातील आयकर भरणा केलेल्या कागदपत्रांची मागणी केली आहे. ईडी कार्यालय येथून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी
दरम्यान, रिया चक्रवर्तीने सुशांतच्या केवळ दोनच गोष्टी तिच्याकडे असल्याचे म्हटले आहे. यात सुशांतने एका वहीच्या पानावर काही लोकांचे मानलेले आभार व सुशांतच्या 'छिछोरे' या चित्रपटाचे नाव असलेली पाण्याची बाटली यांचा समावेश असल्याचे तिने म्हटले आहे. सुशांतने त्याच्या जवळच्या एका वहीत क्रमांकानुसार त्याच्या कुटुंबातील व्यक्ती आणि रिया बद्दल लिहिले होते. यात त्याने म्हटले आहे, की 'मी माझ्या आयुष्यासाठी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील लिल्लूसाठी (शोविक चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यातील बेबूसाठी (रिया चक्रवर्ती) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील सरांसाठी (केके सिंह, सुशांतचे वडील) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील मॅडमसाठी(सुशांतची आई) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील फजसाठी (सुशांतचा पाळीव कुत्रा) मी कृतज्ञ आहे, माझ्या आयुष्यातील सर्व प्रेमासाठी मी कृतज्ञ आहे.'