मुंबई -महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे. मात्र, अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, असे आवाहन प्रशासनाने केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.
बचाव कार्य व रस्त्यावरील अडथळे काढणे लगेच सुरू करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी ओसरले आहे. मात्र, महाड तालुक्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेले असून बचाव पथकांच्या सहाय्याने नागरिकांना संपर्क करून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माणगाव, पाचाड मार्गे महाड रस्ता, माणगाव, महाड महामार्ग, गोरेगाव, दापोली रस्ता सुरू झाला आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली. कोंझरपासून पुढे तेटघरपर्यंत रस्ता मोकळा करण्यात आला आहे. तेटघरपासून पुढे मोहोप्रेमार्गे आचळोलीकडून नातेखिंडला पोहोचता येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा -LANDSLIDE AT MAHAD : महाडमध्ये कोसळली दरड; अनेक लोक अडकल्याची भीती