महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार..? - मुंबई राजकीय बातमी

प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असा मुद्दा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केल्याची चर्चा आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jun 12, 2021, 5:08 PM IST

Updated : Jun 12, 2021, 7:00 PM IST

मुंबई- शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असा मुद्दा शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार विरोधी पक्षाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार होतील का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

बोलताना राजकीय विश्लेषक प्रधान

राजकीय विश्लेषक व रणनीतीकार प्रशांत किशोर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक मुद्यांवर चर्चा सुरू झाली आहे. देशातील राजकीय परिस्थिती, होऊ घातलेल्या निवडणुका आणि भाजप विरोधात आघाडी या मुद्यांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यासोबतच पुढे होणाऱ्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. विरोधकांना एकत्र आणू शकणारे सध्या पवार हे एकमेव नेते असून त्यांना आगामी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा चेहरा बनवण्यासाठी तयारी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, यावर राष्ट्रवादीकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

याबाबत राजकीय नेत्यांनी अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. मात्र विरोधकांच्या भूमिकेवर आणि एकंदर राजकीय स्तिथीबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात ते बघूया..

लोकांमध्ये मिसळणारे शरद पवार राष्ट्रपती पदाच्या चौकटीत काम करू शकतील का ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कामांचा अनुभव दीर्घ आहे. देशात भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपला कसे रोखता येईल याची रणनीती आखणे गरजेचे आहे. त्यात शरद पवार हे अग्रस्थानी असतील, अशी विरोधकांमध्ये चर्चेला जोर चढला आहे. विरोधक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे बघत आहेत. तर काहींना पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे, असेही वाटते. मात्र, याबाबत मत-मतांतरे आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पदाबाबत शरद पवार तयार होतील असे वाटत नाही. लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेते राष्ट्रपती पदाच्या चौकटीत काम कसे करू शकणार, असे मत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी या मुद्यावर व्यक्त केले आहे.

शरद पवार सक्रिय राजकारणातील नेते

शरद पवार राष्ट्रपती झाले तर, सरकार कोणतेही असो त्यांचा त्या सरकारशी संघर्ष होईल. कारण सक्रिय राजकारणातच शरद पवार नेहमी राहिले आहेत. राजकारणात महत्वकांक्षी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच सध्या शरद पवार हे आपल्या पक्षाच्या प्रत्येक बारीक नियुक्त्यामंध्ये देखील लक्ष ठेऊन असतात. महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक धोरणात्मक निर्णयात शरद पवार यांचे लक्ष असते. त्यामुळे आता विरोधकांच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार होण्याची शक्यता फार कमी असल्याचे मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी व्यक्त केले आहे.

पुढच्या होणाऱ्या राष्ट्रपती निवडणूक शरद पवार यांनी लढावी, अशी गळ प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना या भेटीदरम्यान घातली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा, लोकसभा आणि भाजपची सत्ता असलेले राज्याची संख्या पाहता राष्ट्रपती निवडून आणण्याची एकतर्फी क्षमता असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा पराभव समोर असताना शरद पवार अशी निवडणूक लढवतील का? याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा -पाच महत्त्वाच्या भेटीतून समजून घ्या महाराष्ट्राचे राजकीय गणित

Last Updated : Jun 12, 2021, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details