महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उत्तर मुंबई लोकसभा : उर्मिला मातोंडकर समोर गोपाळ शेट्टींचे तगडे आव्हान - गोपाळ शेट्टी

२०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ४६ हजार ५८२ मतांची आघाडी घेऊन गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रातील सर्वाधिक मत पदरी पडणाऱ्यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी एकमेव ठरले होते. याच गोपाळ शेट्टींसमोर आघाडीने उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अवघ्या महिन्याभरात उर्मिलाने जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असला तरी ४ लाख ४६ हजार मतांची आघाडी घेणारे गोपाळ शेट्टी हे उर्मिला समोरच मोठं आव्हान आहे.

उर्मिला मातोंडकर आणि गोपाळ शेट्टी

By

Published : Apr 22, 2019, 2:00 PM IST

Updated : Apr 22, 2019, 3:11 PM IST

मुंबई- लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून मंगळवारी मतदान होणार आहे. राज्यातील लोकसभेच्या एकूण मतदारसंघापैकी मुंबईतील मतदारसंघाच्या निवडणुकीला अधिक महत्व आहे. त्यापैकीच एक उत्तर मुंबई मतदारसंघ आहे. भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे काँग्रेसच्या उमेदवार रंगीला गर्ल उर्मिला मांतोडकर समोर तगडे आव्हान आहे. असे असले तरी उर्मिलाने शेट्टींच्या नाकीनऊ आणले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहेत. त्यादृष्टीने या मतदारसंघातील पक्षीय बलाबल, मतांची समीकरणे आणि प्रचारातील मुद्दे् या परिस्थितीचा घेतलेला विशेष आढावा..


२०१४ च्या निवडणुकीत ४ लाख ४६ हजार ५८२ मतांची आघाडी घेऊन गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता. महाराष्ट्रातील सर्वाधिक मते पदरी पडणाऱ्यांमध्ये मुंबईतील गोपाळ शेट्टी एकमेव ठरले होते. याच गोपाळ शेट्टींसमोर आघाडीने उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अवघ्या महिन्याभरात उर्मिलाने जनतेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असला तरी ४ लाख ४६ हजार मतांची आघाडी घेणारे गोपाळ शेट्टी हे उर्मिला समोरच मोठं आव्हान आहे.


जातीय समीकरणे-


या मतदारसंघात मोठ्या संख्येने गुजराती, मारवाडी भाषिक समाजाचा भरणा आहे. त्यापाठोपाठ मराठी, उत्तर भारतीय समाज आहे. यामुळे या समाजाची मते युतीच्या भाजप उमेदवारालाच मिळतील, असा विश्वास युतीला आहे. दहिसरच्या गणपत पाटील नगरसारख्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडपट्टी वसलेल्या भागातील १५ हजार मतदार देखील काँग्रेस भाजप शिवसेनेत विखुरली आहेत. मालाडच्या मालवणी भागातील बहुसंख्य मुस्लीम मते, दलित व मागासवर्गीयांची मते ही काँग्रेसच्या पदरी पडण्याची शक्यता आहे.


इतिहासातील घडामोडी-

या मतदारसंघात २००९ ला काँग्रेसने गोविंदाला उमेदवारी दिली होती. त्यावेळी विरारचा छोकरा व सेलिब्रिटी असलेल्या गोविंदाला उत्तर मुंबईच्या नागरिकांनी पसंती दिली. राम नाईकांचे या मतदारसंघात वर्चस्व असतानाही गोविंदाने त्यांचा पाडाव केला. त्यानंतर या मतदारसंघातून २०१४ साली संजय निरुपम यांनी विजय मिळवला.

२०१४ मध्ये मिळालेली मते

  • गोपाळ शेट्टी (भाजपा)- ६.६४,००४
  • संजय निरुपम (काँग्रेस)- २,१७,४२२
  • सतीश जैन (आप)- ३२, ३६४
  • नोटा- ८,७५८
  • कमलेश यादव (सपा)- ५,५०६

मतदारसंघातील प्रश्न-

या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुर्नविकास, झोपडपट्टी पुर्नविकास, वाहतूक कोंडी आदी प्रश्न कळीचा मुद्दा ठरले आहेत.


पक्षीय बलाबल-

उत्तर मुंबई या मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये ४ जागांवर भाजप आमदारांचे झेंडे आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे.

विधानसभा मतदारसंघ –

  • बोरीवली -– विनोद तावडे (भाजप)
  • दहिसर –- मनीषा चौधरी (भाजप)
  • मागाठाणे -– प्रकाश सुर्वे (शिवसेना)
  • कांदिवली पूर्व - – अतुल भातखळकर (भाजप)
  • चारकोप –- योगेश सागर (भाजप)
  • मालाड पश्चिम -–असलम शेख (काँग्रेस)

गोपाळ शेट्टींसाठी जमेच्या बाजू-

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. मोदी लाटेत तो आणखी भक्कम झाला. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत भाजपने उत्तर मुंबईवरील आपली पकड मजबूत केली आहे. एक खासदार, चार आमदार आणि २४ नगरसेवक अशी लोकप्रतिनिधींची तगडी फौज असलेल्या या मतदारसंघावरील भाजपची पकड स्पष्ट करायला पुरेशी आहे. दहिसर, मागाठाणेसह विविध भागातील शिवसेनेची मते भाजपकडे वळायला फारशी अडचण नाही.

उर्मिला समोरील आव्हानं आणि बलस्थाने-

गोपाळ शेट्टी यांना आव्हान देण्यासाठी सेलिब्रिटी उर्मिला मातोंडकरला जरी काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी, गोविंदा इतकी उर्मिलाच्या चाहत्या वर्गाची क्रेझ नाही. उर्मिलाने उद्योजक असलेल्या काश्मीरच्या मोहसीन अखतर मीर या मुस्लीम तरुणाशी लग्न केलं आहे. यामुळे चारकोप, मागाठाणे, दहिसर, बोरिवली परिसरात असलेले मराठी मतदार तिला आपलसं करतील ही शक्यता कमीच वाटत आहे.

काँग्रेसचा सगळा भरवसा पारंपरिक मतदारांवर आहे. संजय निरुपमांना २००९ च्या निवडणुकीत २ लाख ४९ हजार मतं मिळाली होती. २०१४ ला ती मते २ लाख १७ हजारांवर आली. याचा अर्थ काँग्रेसची किमान सव्वा दोन लाख मते कायम राहतील, असा विश्वास काँग्रेसला आहे. उत्तर मुंबईत मालाड मालवणी व गोराईच्या काही भागातच काँग्रेसचा मतदार वर्ग आहे. काँग्रेसचे माजी आमदार रमेश सिंग ठाकूर, राष्ट्रवादीचे प्रकाश सुर्वे यांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केल्याने मागाठाणे, कांदिवली पूर्वेकडील काँग्रेसची मतदार देखील युतीकडे वळली आहेत.

उर्मिलाला मिळणाऱ्या प्रतिसादाने शेट्टींच्या नाकीनऊ-

२०१४ ला संजय निरुपम यांचा युतीच्या गोपाळ शेट्टी यांनी दारुण पराभव केला. मात्र, आता उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात आल्याने समीकरणे काही प्रमाणात बदलली आहे. महिन्याभरात उर्मिलाने प्रचार सभा, सोसायटीच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करून भाजपच्या विरोधात हवा निर्माण केली आहे. एकप्रकारे नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता उर्मिलाने गोपाळ शेट्टी यांच्या नाकीनऊ आणले आहे.

उर्मिलाच्या येण्याने उत्तर मुंबईत संपुष्टात आलेली काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे,तर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण झाला आहे. हा उत्साह त्यांच्या प्रचारातून दिसून येतो. मनसेने भाजप विरोधी भूमिका घेतल्याने मनसे कार्यकर्ते उर्मिला पाठिंबा देत आहेत. तर समाजवादी विचारसरणीचे मतं देखील उर्मिलाच्या बाजूने आहेत. त्यामुळे गोपाळ शेट्टी पुन्हा 4 लाख मतांची आघाडी मिळवतील ही शक्यता फारच कमी आहे. यामुळे या निवडणुकीत उत्तर मुंबईच्या जनतेचा कौल सेलिब्रिटी असलेल्या उर्मिला मातोंडकरला मिळतो की गार्डन सम्राट म्हणून ओळख असलेल्या गोपाळ शेट्टींना हे पाहणे निर्णायक ठरणार आहे.

Last Updated : Apr 22, 2019, 3:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details