मुंबई - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी विधानसभेत जमीन गैरव्यवहाराच्या आरोपाने चांगलेच घायाळ झाले. विरोधकांनी घोटाळ्यांची चौकशी करण्याची मुख्यमत्र्यांकडे मागणी केली. तसेच महसूलमंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक अडून बसले. त्यामुळे चद्रकांत पाटील चांगलेच संतापले होते.
ही जमीन प्रकरणे अर्धन्यायिक निवाडे असल्याने सभागृहात चर्चा होऊ शकत नसल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले. दरम्यान, जयंत पाटलांनी आणखी घोटाळे काढण्याचे जाहीर केल्याने चंद्रकांत पाटील चांगलेच हादरले.
जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चेत सहभागी होताना चंद्रकांत पाटलांच्या कारभाराचे वाभाडे काढले. आरोपांमुळे चंद्रकांत पाटलांची अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. जयंत पाटलांच्या भाषणात अडथळा आणत भाजप आमदार राज पुरोहित म्हणाले, आपली डिमांड काय? त्यावर जयंत पाटील म्हणाले, हे बघा काय वेळ आली आहे पहा. दोन आमदार सभागृहात विचारताहेत की डिमांड काय? कसे चालायचे या भाजप काळात? असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. मुद्दे अर्थसंकल्पातीलच हवेत, मंत्र्यावर आरोप करण्यासाठी इतर मार्ग आहेत. मला नोटीस पण दिली नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर जयंत पाटील म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पाला बाधा आणणारी ही बाब आहे. राज्याच्या महसूलमंत्र्याच्या सह्या कागदावर आहेत. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. तोपर्यंत महसूल मंत्र्यांनी राजीमाना द्यावा. एकनाथ खडसे यांच्यासारखे पदावरून दूर राहून चौकशीला सामोरे जावे, असा आरोप जयंत पाटलांनी केला.
अर्धन्यायिक निर्णयावर दाद मागण्याचा अधिकार फक्त उच्च न्यायालयात आहे. सभागृहात असा अधिकार नाही. हा विषय पटलावरून काढून टाकण्याची मागणी त्यांनी पिठासन अधिकारी संजय केळकर यांना केली. नोटीस न देता जयंत पाटील यांनी आक्षेप घेतले असतील तर विषय कामकाजातून काढू, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शेवटी सांगितले.