मुंबई- राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरण, ऑक्सिजन प्लांटसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी देशाबाहेरील लस खरेदी प्रक्रियाही प्रशासकीय स्तरावर सुरू झाल्याचे थोरात म्हणाले.
लसींचे व्यवस्थापन सुरू
राज्यात दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा बीमोड करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. त्यानुसार 45 वर्षे वयोगटावरील व्यक्तींना लसींचे दोन डोस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता 18 ते 44 वयोगटापर्यंतच्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ही जबाबदारी राज्यांवर सोपवली आहे. मात्र, लसअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवली जात आहेत, अशी वस्तुस्थिती थोरात यांनी मांडली. 18 वर्षांवरील लोकांनाही लस दिली जाणार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर याचे व्यवस्थापन आणि नियोजन सुरू असल्याचे थोरात म्हणाले.
बाहेरुन आणणार ऑक्सिजन बेड
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होण्याची गरज आहे. त्यासाठी एक रकमी पैसे देऊन लस खरेदी करण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. मात्र, केंद्राच्या लसीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही थोरात म्हणाले. ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. भविष्यात त्यात वाढ करण्यात येत आहे. तसेच बाहेरुन आणखी ऑक्सिजन बेड्स घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आल्यास सरकार सक्षमपणे थोपवून, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती
सध्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. राज्य सरकारने ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास दीड महिन्याचा वेळ प्लांट उभे करण्यास लागू शकतो. ऑक्सिजनचे उत्पादनासाठी साखर कारखान्यात प्लांट उभारले जात आहेत. यशस्वीपणे आपण साखर कारखान्यांमधून ऑक्सिजन उत्पादन करु शकतो, असे थोरात म्हणाले.
सातव यांची प्रकृती स्थिर
काँग्रेस नेते राजीव सातव यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते आजारातून बाहेर येतील, असे थोरात म्हणाले.
हेही वाचा -कोरोनामुळे अनुरक्षण गृहातील अनाथ मुलांना संस्थेत 2 वर्ष अधिक राहता येणार